नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर ८ परिसरातील तनिष्का स्त्री प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी नुकतीच नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फान्सिसो यांची सदिच्छा भेट घेवून परिसरातील समस्या त्यांना निवेदनातून मांडल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नेरूळ पश्चिमेला कार्यान्वित असलेल्या पोलीस चौकीत किमान एकतरी पोलीस २४ तास कार्यरत असावा. समाधान चौक परिसरात बंद असलेली सध्याची पोलीस चौकी नेरूळ पश्चिमेला स्थंलातरीत करावी. नेरूळ सेक्टर ८मधील भाऊसाहेब शेरे उद्यान व छत्रपती शाहू महाराज उद्यान या पालिकेच्या दोन उद्यानात मद्यप्रेमी रात्री मद्यपान करून महिलांसमोर अश्लिल हावभाव करत असतात, त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा, नेरूळ सेक्टर ८मधील माणक हॉस्पिटल व सेक्टर १०मधील साईबाबा हॉटेलच्या मागील रेल्वे रूळाला समांतर सर्व्हिस रोड येथे शाळेच्या बसेस उभ्या असतात. त्या बसेसचा फायदा घेवून मुले-मुली अश्लिल चाळे करताना दिसतात. गर्दुले, मद्यपि तेथेच बसून रात्रभर गोंधळ घालत असल्याचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
तनिष्का स्त्री प्रतिष्ठा’च्या गटप्रमुख सुनिताताई रतन मांडवे, सुजाता बने, उर्वशी मेस्त्री, श्रृती नगाले, मनिषा वालकुंडे, भाविका काळे, रोहीणी सानप, आरती दल, नेहा पाटील, संगिता रनावरे, सुनंदा शेलार आदींनी नेरूळ पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फान्सिसो यांच्याशी वार्तालाप केला. महिलांची पोलीस ठाण्यात वरिष्ठ पदावर झालेली नियुक्ती आणि पोलीस ठाण्याची सर्व सूत्रे महिलेच्या हाती आल्याने पोलीस ठाण्यात येण्यास महिलांनाही यापुढे कोणताही संकोच वाटणार नसल्याची प्रतिक्रिया सुनिताताई मांडवे यांनी यावेळी व्यक्त केली.