अभिजित पानसेंसह गजानन काळेंची तोफ धडाडणार
अमोल शीरसागर
नवी मुंबई : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घटकांकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून दोन लाख मतदानाची अपेक्षा करण्यात येत असली तरी मनसेला नवी मुंबईतून सर्वाधिक मतदान होण्याची अपेक्षा आहे. शहर अध्यक्ष गजानन काळेपर्वांनंतर जनसामान्यांमध्ये मनसेने मारलेली मुसंडी पाहता व काळेंच्या मार्गदर्शनाखाली मनविसे सांस्कृतिकची अमर पाटीलने केलेली बांधणी पाहता मनसे लोकसभा निवडणूकीत गरूडभरारी मारण्यासाठी गल्लीबोळात नाक्यानाक्यावर हात-पाय मारू लागली आहे. मनविसे सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ पूर्वेला शनिवारी,२९ मार्चला निवडणूकीच्या तयारीसाठी निवडणूक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मनसे आणि मनविसे ही नवी मुंबईत प्रारंभापासूनच गटबाजीसाठी आणि पदाधिकार्यांच्या महत्वाकांक्षेसाठी ओळखली जाते. त्यामुळे मनसे व मनविसे मोठी झाली नाही, पण त्यात वावरणारे घटक मात्र नावारूपाला आले, अगदी पाठीसी जनाधार नसतानाही. पण मनविसे सांस्कृतिक विभाग मात्र त्याला अपवाद ठरला. मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे लोकसभाध्यक्ष अमर पाटील यांनी या विभागाची मोर्चेबांधणी प्रारंभापासूनच गटबाजीपासून अलिप्त राहीली. अमर काळे हा गजानन काळेंच्या छावणीतील आक्रमक कार्यकर्ता तसेच पाठीशी कार्यकर्त्यांचे जाळे असणारा कार्यकर्ता. बाकीचे कोण बापपुण्याईवर, कोणी बोलीबच्चनवर तर कोणी ग्रामस्थच्या लेबलवर काळेंच्या अवतीभोवती वावरत आहे. त्यांच्या पाठीशी जनाधार किती आहे, ते गजानन काळेंनाही एव्हाना माहिती झाले असणार.
गतकाही वर्षात अमर पाटील,विवेक सुतार, गिरीराज दरेकर, चेतन खैरनार, गणेश पालवे, बाबाजी गोडसे यांनी मनविसे सांस्कृतिकचा वारू चौखुर उधळला. आता त्यात विलास चव्हाण, मंगेश वाकचौरे आदींसह अनेक मंडळी नव्याने सामील झाली आहे. अमर पाटील यांचे स्वत:चे दहीहंडी पथक असून मनविसे सांस्कृतिकच्या माध्यमातून नवी मुंबईत सातत्याने उपक्रमही राबविले जातात. मध्यंतरी मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाला मनविसे सांस्कृतिकने भव्य रॅलीही काढली होती. अशी रॅली काढणे शिरीष पाटील यांच्या अधिकृत तर संदीप गलुगडेंंच्या अनधिकृत मनविसेच्या कार्यकारिणीलाही शक्य झाले नाही.
मराठी साहीत्यातील ख्यातनाम कवी नारायण सुर्वे यांनी ‘माझे विद्यापिठ’मधून ‘बाप’ या विषयाची महती विषद केली आहे. तथापि काळेसमर्थकांमधील नेरूळ गाव आणि घणसोली कॉलनीतील घटकांनी याच विषयावर राजकीय भाष्य करत मनविसे सांस्कृतिकच्या पदाधिकार्यांचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयास केला असून मनसे शहराध्यक्ष काळेंसमोर हे विषय घडत असतानाही त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे.
मनविसे सांस्कृतिक विभागाच्यावतीने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ पुर्वेला सेक्टर ५ परिसरातील फ्रुटवाला हॉलमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे सांयकाळी ५ ते ८ या वेळेत आयोजन केले आहे. या मेळाव्याला मनसेचे उमेदवार अभिजित पानसेंसह शहर अध्यक्ष गजानन काळे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी अमर पाटील, विवेक सुतार, गिरीराज दरेकर, विलास चव्हाण, चेतन खैरनार, गणेश पालवे, मंगेश वाकचौरेसह मनविसे सांस्कृतिकचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम करत आहेत. या मेळाव्याला मनविसे सांस्कृतिकचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतीलच, पण लोकसभा निवडणूकीत मनसेच्या खांद्याला खांदा लावून मतदारांना बाहेर काढून मनसेकडे आकर्षित करण्यासाठी मनविसे सांस्कृतिकचा मोठा सहभाग राहणार असल्याची माहिती मनविसे सांस्कृतिकचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष विवेक सुतार यांनी दिली.