मनोज मेहेर (९८९२४८६०७८)
नवी मुंबई :ठाणे लोकसभा मतदारसंघाचा मिडीया मॅनेजमेंटचा अभ्यास केल्यास गतलोकसभा निवडणूकीत शरद पवारांच्या एनसीपीने आघाडी घेत इतरांना सर्वच आघाड्यांवर पराभूत केले होते. गतपराभवातून बोध घेत शिवसेनेने मिडीया मॅनेजमेंट राबविताना एनसीपीच्या बारकाव्याचा अभ्यास करत तोडीस तोड व्यूहरचना बनविल्याचे पहावयास मिळत आहे. एनसीपी प्रचारामध्ये आप व मनसेकडे दुर्लक्ष करत शिवसेनेवर ‘टीका’ करत असल्याने शिवसेनेची युवा सेना लवकरच चोख प्रत्युत्तर देताना पहावयास मिळणार आहे.
गुढीपाडव्यानंतर एनसीपीची मिडीया अटॅक पॉलिसी त्यांच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या प्रचारमोहीमांना दोन वेळा आरोप-प्रत्यारोपांच्या चाली एनसीपीकडून खेळल्या गेल्याचे एनसीपीला त्याच धक्कातंत्राने मतदारांसमोर उघडे पाडण्याची योजना शिवसेनेच्या नवी मुंबईतील काही बुध्दीजीवी घटकांकडून आखण्यात आली असून युवा सेनेची नवी फळी त्यांना साथ देण्यास उत्सूक झाली आहे.
शिवसेनेने कोपरखैराणेत पाठविलेल्या पालिकेला नोटींसावर घेतलेल्या पत्रकार परिषदेवर एनसीपीचे नगरसेवक एम.के.मढवी यांचे पत्रक एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंटकडून पाठविण्यात आले होते. वास्तविक एम.के.मढवी हे कोणत्याही पत्रकाराला न भेटता एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंट राबविणार्या पगारी घटकांनी ते ई-मेलद्वारे वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्दीला पाठविले होते. शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंच्या एपीएमसी भेटीवर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचीही प्रतिक्रिया एम.के.मढवींच्या धर्तीवर प्रसिध्द करण्यात एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंट राबविणार्या पगारी घटकांना यश आले.
एनसीपीने आपल्या चाली अगोदर खेळल्याने शिवसेनेने सावध पावित्रा घेत एनसीपीला तोडीस तोड उत्तर देत मतदारांच्या रिंगणात खेचण्याची धाडसी खेळी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या काही मुत्सद्यांकडे विविध योजना राबविल्या जाण्याची शक्यता असून त्यास युवा सेनेची ताकद लाभल्याने येत्या काही दिवसातच शिवसेनेची मॅनेजमेंट एनसीपीच्या मॅनेजमेंटच्या मर्यादा स्पष्ट करणार असल्याचा विश्वास शिवसेना व युवा सेनेच्या घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
भविष्यात पुन्हा एकवार एम.के.मढवींच्या नावाने पत्रक काढले तर पालिकेचा अतिक्रमण घोटाळा, एम.के.मढवींविषयी विविध वर्तमानपत्रात छापून आलेली कात्रणे यासह एम.के.मढवींचा त्या काळात ‘पांढर्या घराच्या’ आसपासच असलेला वावर आदी इंत्यभूत माहिती शिवसेनेच्या थिंक टँककडून जमा करण्यात आली आहे. एपीएमसीत शिवसेनेच्या घटकांकडून यापुढे जोरदार अभियान राबविले जाणार असल्याने एनसीपीच्या प्रत्युत्तराची शक्यता गृहीत धरून माथाडी कामगारांनी केलेल्या आत्महत्या, माथाडींच्या पगारावर माथाडी संघटनांतील माथाडी नेत्यांचे पगार व राहणीमान, महागाई भत्याचे गौडबंगाल, सिम्पलेक्समधील भुखंडावर आरक्षित रूग्णालय व शाळेएवजी एका कोपर्यात निर्माण झालेली पिठाची चक्की व मिरची वाटप टंकन, कोपरखैराणेत माथाडी टक्क्यांची सध्याची दुर्रावस्था, चोरट्या कृषीमालाच्या व्यापारामुळे व्यापाराची व माथाडींची झालेली दशा, खुल्या स्पर्धेत कृषी माल विक्रीच्या परवानगीमुळे देशोधडीला लागलेला माथाडी कामगार व एपीएमसीतील बाजार आवार यावर तपशीलवार माहिती शिवसेनेच्या चाणक्यांनी गतकाही दिवसांमध्ये जमा केल्याने शिवसेनेच्या नजीकच्या एपीएमसीतील प्रचार अभियानावर एनसीपीकडून टीकास्त्र आल्यास त्यात तोडीस तोड उत्तर देवून मतदारांच्या समोरच खुले चर्चेचे आव्हान देवून एनसीपीच्या आरोपांचे वस्त्रहरण करण्याची शिवसेनेच्या घटकांनी महत्वाकांक्षी खेळी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेतील ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करत नवी मुंबईकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नवी मुंबईतील शिवसेनेच्या धुरींणाकडून केला जात असून नवी मुंबई महापालिकेतील कारभाराची टक्केवारी चव्हाट्यावर आणण्याची तयारी शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांनी जय्यत स्वरूपात केली आहे. नवी मुंबईचा विकासाचा दावा एनसीपीकडून सातत्याने केला जात असताना पालिकेच्या तिसर्या सभागृहात एनसीपीला स्पष्ट बहूमत असतानाही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे सातत्याने त्यांच्या प्रभागातील विकासकामांचे ठराव सव्वा वर्ष फेटाळण्यात आले होते. विकासकामांचा दावा करणार्यांनी अर्ध्या नवी मुंबईला सव्वा वर्षे विकासापासून वंचित ठेवले होते. याबाबतही त्यावेळच्या वर्तमानपत्राची कात्रणे जमा करून त्यांच्या विकासाच्या दाव्याची हवा काढण्याचा जोरदार प्रयास शिवसेनेकडून केला जाणार आहे.
एनसीपीकडे ना. गणेश नाईक व संजीव नाईकांचा अपवाद वगळल्यास मातब्बर वक्ते नाहीत. त्यात शिवसेनेच्या छावणीत दाखल झालेल्या कलशातील वैभवाचे आकर्षण नवी मुंबईतील युवकांमध्ये वाढीस लागल्याने वैभवाला पुढे करून बालाजीला नामोहरण करण्याची खेळीही शिवसेनेकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत विजय चौगुले, ऍड. मनोहर गायखे, विठ्ठल मोरे, नव्याने शिवबंधनांची गोडी लागलेले सुकुमार किल्लेदार, दिलीप घोडेकर, विजय माने असे विविध एकाहून एक सरस वक्त्यांचा तोफगोळा उपलब्ध आहे. एनसीपीकडून शिवसेनेवरच ‘अटॅक’ अधिक होत असल्याने एनसीपी मनसे व आपला स्पर्धेत मानत नसल्याचा संदेश मतदारांपर्यत गेला आहे.
एनसीपीमध्ये नाराज बिभीषणांची संख्या काही प्रमाणात असल्याने नाराज घटकच शिवसेनेच्या थिक टँकच्या संपर्कात असून तेच यांना खाद्य पुरवित असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामांवर एनसीपीने दावा केल्यास विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही रखडलेली कामे सप्रमाण मतदारांसमोर मांडण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. एनसीपीच्या मिडीया ऍडव्हान्टेजला मिडीयाच्याच मागील बातम्या दाखवून त्यांचा मिडीया प्रचार कितपत सत्य आणि कितपत असत्य दाखविण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू झाली आहे. पोटनिवडणूकीतील निकालावर एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंट राबविणार्या पगारी घटकांनी शिवसेनाव कॉंग्रेसची अभद्र युती छापून आणताना कॉंग्रेस दुखावण्याचे काम केले आहे. कॉंग्रेसने पालिका स्तरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून एनसीपीला प्रचारात नवी मुंबई कॉंग्रेसींचे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच मंत्रालयीन पातळीवरील कामाचे श्रेय एनसीपणे घ्यायचा प्रयास केल्यास कॉंग्रेसी घटकांनाही अंगावर घेण्याची तयारी एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंट राबविणार्या पगारी घटकांना घ्यावी लागणार आहे. मनसेचे घटकही मिडीया मॅनेजमेंट राबविण्यात तरबेज झाले असून शहरअध्यक्ष गजानन काळे, उपशहरअध्यक्ष गजानन खबाले, निलेश बाणखिले, सविनय म्हात्रे, शिरीष पाटील, अमर पाटील, विलास चव्हाण यांच्यासह अनेक घटक पत्रकारांशी व्यक्तिगत पातळीवर जवळीक ठेवून आहेत. राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसेदेखील मिडीयातील आपल्या सलगीचा करिश्मा दाखविण्याची शक्यता आहे. एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंट राबविणार्या पगारी घटकांना शिवसेना, मनसे, दुखावलेले कॉंग्रेसी आदींचा एकत्रित सामना करावा लागणार आहे. आम आदमी पार्टीमध्ये माहिती अधिकार चळवळीचे रथी-महारथी असल्याने त्यांनी जमा केलेल्या माहितीचा तोफगोळा एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात फुटण्याची शक्यता असून या तोफगोळ्यांचा सामनाही एनसीपीच्या मिडीया मॅनेजमेंटला करावा लागणार आहे. तुर्तास शिवसेनेच्या प्रचार अभियानावर टीका केल्यास एनसीपीला शिवसेना-युवा सेनेच्या थिक टँकच्या टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.