मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई :- उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असून एनसीपीचे उमेेदवार व विद्यमान खासदार संजीव नाईक ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
खासदार संजीव नाईक यांच्याविरोधात शिवसेनेने आमदार राजन विचारेंना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. मनसेनेदेखील अभिजित पानसेंेसारखा तगडा मोहरा उतरवून विधानसभा निवडणूकीपूर्वीची ताकद चोखण्याचा प्रयास केला आहे. आम आदमी पार्टीतर्फे संजीव साने निवडणूक रिंगणात दाखल झाले आहे. कागदोपत्री नोंदणीकृत झालेल्या खर्याखुर्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऍड. विनोद गंगवाल या सामाजिक कार्यकर्त्याला निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
एनसीपी, शिवसेना व आता काही दिवसांपासून मनसेने प्रचार अभियानात आपला जोर वाढविला आहे, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचा पाहिजे तेवढा प्रचारात जोर दिसत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विनोद गंगवाल यांनी ठिकठिकाणी होर्डिग लावून प्रचारात आपल्याही सहभागाचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयास चालविला आहे. कॉंग्रेस आणि एनसीपीची आघाडी असली तरी नवी मुंबईत मात्र कॉंग्रेसी घटकांचा एनसीपीशी खर्या अर्थांने अजूनही मनोमिलाफ न झाल्याने कॉंग्रेस एनसीपीशी चार हात लांबच असल्याचे पहावयास मिळत आहे. एनसीपीला प्रचार अभियानामध्ये नवी मुंबईत आजही गणेश नाईक यांचाच आधार घ्यावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मनसेच्या अभिजित पानसेंनी व शिवसेनेच्या आ. राजन विचारेंनी गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईचा कानाकोपरा ढवळून काढल्याने प्रचारात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच रंगत वाढली आहे. एनसीपीची पक्षबांधणी कमकुवत असल्याने या पक्षाला तारण्याची पुन्हा एकवार ना. गणेश नाईकांनाच किमया करावी लागणार आहे. एनसीपीच्या संजीव नाईकांना पक्षाच्या नेत्या सौ. मंदाताई म्हात्रे, ठाण्यातील मातब्बर नेते वसंत डावखरे यांच्या मदतीबरोबरच ठाण्यातील, भाईंदरमधील कॉंग्रेसी घटकांना सोबत घेवून चालावे लागणार आहे.
४ एप्रिलला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता संजीव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून संजीव नाईकांना पुन्हा दिल्लीत जाण्यासाठी नवी मुंबईतून सर्वाधिक मतदान वळवावे लागणार आहे. नव्याने आलेल्या आपला मिळणारी मते कोणाचा ताप वाढवतील यावर या मतदारसंघाच्या निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.