नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी नवी मुंबईत प्रचार अभियान राबविताना पदाधिकार्यांचा व कार्यकर्त्यांचा शहर अध्यक्ष गजानन काळेंच्या समवेत भेटीगाठीचा सपाटा लावला असून बुधवार, दि. २६ मार्चला पानसे सानपाड्यातील कार्यकर्त्यांची व पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
सानपाडा, सेक्टर ५ मधील श्री. नागेश्वर शिव मंदीरामध्ये सकाळी १०.३० वाजता अभिजित पानसे कार्यकर्ते व पदाधिकार्यांशी सुसंवाद साधणार आहे. सानपाडा परिसरात व सानपाडा पामबीच परिसरात मनसेची संघटना बांधणी गजानन काळेंच्या मार्गदर्शनाखाली भक्कम झाली असून उमेश ठाकूर, विलास घोणे, विठ्ठल गावडे, योगेश शेटे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांमुळे सानपाडा व सानपाडा पामबीच परिसरात मनसेचा नावलौकीक वाढीस लागला आहे. सानपाडा परिसरात शिवसेनेच्या खालोखाल मनसेचा दबदबा असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा क्रमांक या परिसरात मनसेनंतर लागतो. सानपाडा पामबीच परिसरात सर्वाधिक राजकीय ताकद कॉंग्रेसची पहावयास मिळते. पानसेंसमवेत शहर अध्यक्ष गजानन काळेदेखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.