मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई – नवी मुंबईकरांनाच नाही तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या लक्षात संजीव नाईकांची नौंटकी चांगलीच लक्षात आली आहे. पाहणी अभियान करायचे, वर्तमानपत्रात बातम्या छापून आणायच्या. समस्या सुटल्या नाहीत आणि खासदारांनीही कधी आंदोलन केले नाही. सर्व नौंटकी करून रेल्वे प्रवाशांच्या भावनाशी खेळ केला असल्याने आता रेल्वे प्रवाशीच मतदानातून या नौंटकी खासदाराच्या नौंटकीचा समाचार घेतील असे सणसणीत प्रतिपादन शिवसेनेचे सुकुमार किल्लेदार यांनी सानपाड्यात चौकसभेत केले.
सोमवारी सानपाडा, जुईनगर, शिरवणे, सानपाडा-पामबीच, शिवाजीनगर-नेरूळ येथे सांयकाळी ५ ते रात्री १० या वेळेत शिवसेनेच्या चौकसभांचा धुराळा उडाला. या चौकसभांमध्ये उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना किल्लेदार यांनी संजीव नाईकांच्या कामाचा पंचनामा करीत महापालिकेतील टक्केवारीच्या विषयाला हात घातल्याने शिवसेनेच्या स्थानिक भागातील तोफगोळ्यांना एनसीपी कशी सामोरे जाते याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.
वारंवार रेल्वे स्थानकांना भेटी द्यायच्या. समस्या पाहायच्या. अधिकार्यांवर फैरी झाडत समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा द्यायचा. समस्या काही आजवर सुटल्यास नाहीत आणि या नौंटकी खासदाराने एकही जनआंदोलन रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर केले नाही. पाहणी अभियानाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांसोबत रेल्वे पोलिसांचा, रेल्वे अधिकार्यांचा, सिडको अधिकार्यांचा वेळ वाया घालविण्याचाच कार्यक्रम करण्यात खासदाराने पाच वर्षे घालविली असल्याचा घणाघाती टोला किल्लेदारांनी आपल्या भाषणातून चढविला.
कॉंग्रेस पक्षानेच महापालिकेतील टक्केवारीचा भ्रष्टाचार उजेडात आणला आहे. पाच टक्के व्हाईट हाऊसला दिल्याशिवाय कामेच मंजूर होत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी काही महिन्यापूर्वी केला होता. महापालिकेत चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात कॉंग्रेसने दशरथ भगतांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढला होता आणि आज तेच दशरथ भगत खासदारांसोबत उमेदवारी अर्ज भरायला जातात. पालिकेतील भ्रष्टाचाराला कॉंग्रेसनेही मान्यता दिली काय असा नवी मुंबईकरांचा समज होत असल्याने पालिकेतील भ्रष्टाचार्यांना लोकसभा निवडणूकीत मदत करणार काय, याबाबत कॉंग्रेसने तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन किल्लेदार यांनी यावेळी केले.
ऊसाच्या झोनबंदी उठली ती केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळेच आणि ग्रामीण भागात ऊसाला चांगला दर मिळाला तो केवळ ग्रामीण भागातील राजू शेट्टीच्या आंदोलनामुळेच. या शहरात तुम्ही-आम्ही पोटासाठी आलेलो शेतकर्यांचीच मुले आहोत. ग्रामीण भागात होत असलेल्या कार्याची पोचपावती देण्याची वेळ आता आम्हा शहरी भागातील शेतकर्यांच्या मुलांवर येवून ठेपली आहे. ऊसाच्या माध्यमातून शेतकर्यांची पिळवणूक करण्याचे साखरसम्राट ठेचण्याचे काम आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी केले आणि आज ऊसाला चांगला दर मिळवून देण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले असल्याने आपला गावचा ऊस आणि शेतकर्यांसाठी केलेले काम लक्षात घेवून येथील शहरवासियांनी राजन विचारेंना भरघोस मतदान करून आपण कृतज्ञ आहोत, कृतघ्न नाही हे येथील प्रस्थापितांना दाखवून देण्याची योग्य वेळ आली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
सध्या उमेदवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेत राजन विचारेंचा अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण ते राजकीय गुन्हे आहेत. जनतेसाठी जनआंदोलनातून दाखल झालेले गुन्हे आहेत. प्रचार करायचाच असेल तर एनसीपीवाल्यांनी मुख्तार अन्सारी या भंगार माफियाचा करावा. गोपाळ सैंदाने या पोलीसाच्या हत्येचा आरोप असलेल्या मुख्तार अन्सारीला पोलीस ठाण्यातून कोणी सोडविले, पालिकेच्या वाशीतील रूग्णालयात उपचारासाठी कोणी दाखल केले हे नवी मुंबईकरांना चांगलेच माहिती असल्याने गुन्हेगारांचा पाठ थोपटणार्यांना व त्यांच्या मदतीला धावून जाणार्यांना नवी मुंबईकर जनता मतदानातून धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
नवी मुंबईतील भुखंड सवलतीच्या दरात शिक्षण सम्राटांच्या घशात गेले आहेत. या भुखंडावर उभ्या राहीलेल्या शिक्षण संकुलातील शिक्षण महागडे आहे. शिक्षण घेवूनही रोजगार भेटत नसल्याचे विदारक व भयावह चित्र आपल्या भाषणातून उभे करत महागाई आणि बेरोजगारीच्या विषयाचाही ऊहापोह किल्लेदार यांनी आपल्या भाषणातून केला.
किल्लेदार यांच्या चौकसभा व त्यांची आक्रमक भाषणे आणि भाषणातून वर्तमानपत्रातील बातम्यांची पुराव्यादाखल सादर होणारी कात्रणे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करत असून एनसीपीच्या अडचणी वाढवित आहे. चौकसभांमधील किल्लेदारांची घणाघाती भाषणे चौकसभांना जमणार्या गर्दीला आकर्षणाचा विषय ठरू लागली आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकातील उत्तरेकडच्या दिशेला शिवसेनेच्या चौकसभांना सांयकाळी ५ वाजता सुरूवात झाली. त्यानंतर सानपाडा रेल्वे स्थानकाजवळील बधाई चौक, सानपाडा-पामबीच भागातील मोराजचा चौक, सानपाडा गाव, जुईनगर, शिरवणे येथे टप्याटप्याने चौकसभा होत नेरूळ शिवाजीनगर येथील चौकसभेने मंगळवारच्या चौकसभांचा धडाला विसावला. या चौकसभांमध्ये शिवसेना नवी मुंबई संघठक सौ. रंजनाताई शिंत्रे, शहर संघठक सौ. रोहीणीताई भोईर, शिवसेनेचे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य सोमनाथ वास्कर, विभागप्रमुख नरेश चाळके,जयवंत भोईर, मंगेश सातपुते, भाजपाचे संतोष पाचलग, सचिन खाडे आदी सहभागी झाले होते.