मनोज मेहेर -९८९२४८६०७८
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा केला असल्याने सभांपाठोपाठ चौकसभांचा धुराळा आणि कार्यकर्ता मेळावा यामुळे १९९०-९५च्या धर्तीवर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेना आमदार राजन विचारेंच्या प्रचारासाठी शिवछत्रपतींची भूमिका छोट्या पडद्यावर साकारून नावारूपाला आलेले कलावंत डॉ. अमोल कोल्हे बुधवारी सानपाड्यात जाहीर सभा घेणार आहेत.
सानपाडा परिसरात जुन्नर, आंबेगावचा समाज मोठ्या प्रमाणावर संघठीत असून डॉ. अमोल कोल्हे हे नारायणगावचे असल्याने कोल्हेच्या सभेचा शिवसेनेला फायदाच होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नव्याने जोश निर्माण झाला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत सानपाडा परिसरात शिवसेनेची ताकद लक्षणीय असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांच्या नेतृत्वाखाली या भागात शिवसेनेची भक्कम पक्षसंघटना बांधणी झालेली आहे. सोमनाथ वास्करसारखे युवा वादळ, मिलिंद सुर्यरावसारखा विभागप्रमुख आणि मातब्बर शिवसैनिकांचे परिश्रम यामुळे सानपाडा हा मागच्या काही काळात शिवसेनेचा बालेकिल्ला झालेेला आहे. काही महिन्यापूर्वी मनसेची रणरागिनी विद्या पावगे (किर्दत) शिवसेनेत आल्याने येथील महिला संघटनेला बळकटी प्राप्त झालेली आहे.
बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी सानपाडा सेक्टर ८ परिसरात गणेश मंदीरामागील, पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या हुतात्मा बाबु गेनू मैदानात डॉ. अमोल कोल्हेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत कोल्हेसोबत शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांच्यासह सुकुमार किल्लेदारांचे भाषण हे शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
दोन दिवसापूर्वीच टक्केवारीचा आरोप करत नवी मुंबईसह ठाण्याच्या राजकारणात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी खळबळ उडवून दिली आहे. चौकसभांमध्ये सातत्याने भाषण करत सर्वच प्रकरणाची किल्लेदार वर्तमानपत्रांच्या बातम्यांची कात्रणे दाखवित चिरफाड करत असल्याने ते सानपाड्यात काय बोलतात, याकडेही सानपाडावासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
या मेळाव्यासाठी शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे सानपाड्यातील युवा नेतृत्व सोमनाथ वास्कर, नगरसेविका सौ. कोमल वास्कर, विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव, महिला आघाडीच्या विद्या पावगे (किर्दत) यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक परिश्रम करत आहेत.