सुजित शिंदे – ९८६९२३६४४४
नवी मुंबई : – पाकड्यांनी दोन हिंदुस्थानी सैनिकांचा शिरछेद केल्यानंतर षंडासारखे थंड बसणारे सरकार नको, तर दोन हजार पाकड्यांची मुंडी पिरगळणारे सरकार पाहिजे. असे सरकार देण्याची कुवत आघाडीमध्ये नाही तर महायुतीमध्ये आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना घरी बसवून राजन विचारे यांना संसदेत पाठवा, असे आवाहन चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी येथे केले.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमदेवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी सानपाडा येथील बधाई हॉटेलसमोर आयोजित केलेल्या चौकसभेत अमोल कोल्हे यांनी कॉंग्रेस आघाडी सरकारचे पुरते वधर्हिंरण केले. देशाला स्वातंत्र्य मिळून आता ६६ वर्षे झाली असली तरी आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात अन्न, वस्त्र आणि निवारा ही मुद्दे येतात, ही फार खेदाची बाब आहे. नवी मुंबईच्या एमआयडीसीत एक चांगली कंपनी येणार होती. मात्र येथील रस्ते आणि असुविधा पाहिल्यानंतर त्या कंपनीने नवी मुंबईचा नाद सोडून दिला. त्यामुळे हजारो तरूणांचा रोजगार बुडाला. मराठी माणूस पाठीवरचा वार विसरतो पण पोटावर मारलेली लाथ विसरत नाही. एमआयडीसीमधील अनेक कंपन्या देशोधडीला लावून सत्ताधार्यांनी आपल्या पोटावर लाथ मारली आहे. आता त्यांना या निवडणूकीत सोडू नका, दिल्ली ऐवजी घरचा रस्ता दाखवा, असे आवाहनही कोल्हे यांनी यावेळी केले.
मी पाच टक्क्याचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी चेवताळले आहेत. त्यामुळेच माझ्यावर एका कामगार नेत्याने शहापूरला अडीचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला आहे. शहापूरला जमीन तर सोडा, पण मी अजून एकदाही गेलेलो नाही. ही जमीन जर आरोप करणार्यांनी शोधून दाखविली तर मी ती त्यांच्या नावावर करून देईल. अगोदरची दोन हजार एकर कमी पडत असली तर त्यात आणखी अडीचशे एकराचे भर पडेल. मी आत्तापर्यंत फक्त बोलतो आहे, पण जर का पेन हातात घेतला तर भल्याभल्यांची पदे जातील, असा इशारा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी या सभेत दिला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, वैभव नाईक, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख प्रकाश पाटील, सोमनाथ वास्कर, सुकुमार किल्लेदार, किशोर शेवाळे, शिवसेना मुस्लिम सेलचे शहरसंघटक सय्यद अब्रार, घनशाम पाटे, मिलिंद सुर्यराव, नगरसेविका कोमल वास्कर आदी उपस्थित होते.