मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
नवी मुंबई : स्वमालकीचे मोरबे धरण असा टेंभा मिरविणार्या आणि सातत्याने राज्य व केंद्र पातळीवरील पुरस्कार मिळविणार्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा चेहरा आज समोर आला आहे. स्वमालकीचे धरण आणि आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्यांमध्येच पाणी नाही असे भयावह चित्र शनिवारी दुपारी ग्रोमा भवनमध्ये लागलेल्या आगीदरम्यान पहावयास मिळेल. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या अग्निशामक दलाचा सुरक्षा सप्ताह सुरु असतानाच ही बाब नवी मुंबईकरांसमोर उघडकीस आली.
मोरबे धरणाच्या मालकी हक्काबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सातत्याने उदोउदो केला जात आहे. स्वमालकीचे धरण असणार्या महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये आग विझविण्यासाठी पाणीच नसल्याचे लाजीरवाणे चित्र उघडकीस आले आहे. माथाडी भवनच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ग्रोमा भवनच्या पहिल्या मजल्यावर शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. ग्रोमा भवन हे व्यापारी वर्गाचे मध्यवर्ती कार्यालय असून येथे मोठ्या प्रमाणावर दुकाने व व्यापाराची कार्यालयेही आहेत. व्यापारी वर्गाने आग लागल्यावर तात्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. तथापि साडेतीन वाजले तरी ग्रोमा भवनच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या धुराचे लोट बाहेर येतच होते. व्यापार्यांनी कळविल्यावर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या खर्या, पण आग विझविण्यासाठी अग्निमशमन दलाच्या वाहनांमध्ये पुरेसे पाणी नसल्याचे उघडकीस आले.
आग मोठ्या प्रमाणावर असतानाही आग विझविण्यासाठी पालिका प्रशासनाच्या होत असलेल्या तोकड्या प्रयासामुळे व्यापारी वर्गाकडून पालिका प्रशासनाप्रती संताप व्यक्त करण्यात येत होता. पालिका अधिकार्यांच्या संतप्त व्यापार्यांकडून शेलक्या भाषेत उध्दारही केला जात होता. अग्निशमन विभागाकडे आग विझण्यासाठी पाणी नसल्याचे लक्षात आल्यावर व्यापार्यांच्या क्रोधात आणखीनच भर पडली. व्यापार्यांनीच अखेरीला खासगी टँकरचालकांना फोन करून पाणी पाठविण्याची विनंती केली.
सध्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सुरक्षा सप्ताह सुरू असून आग विझविण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे माफक पाणीच नसल्याचे ग्रोमाभवनच्या आगीवरून स्पष्ट झाले. आग विझविण्यास पाण्याअभावी मर्यादा पडल्याने या आगीत व्यापार्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. तळमजल्यावरील दुकानांतील मालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वर्दळीच्या ठिकाणी ग्रोमा भवन येत असल्याने बघ्याचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. आग विझविताना पालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाची धावपळ व पाण्याचा अभाव सर्वांना जवळून पहावयास मिळाला. कर गोळा करण्यासाठी व्यापार्यांना व त्यांच्या व्यवसायाला वेठीस धरणार्या महापालिका प्रशासनाला आग विझविण्यासाठी अगिनशमनच्या गाड्यांमध्ये पाणीही ठेवता येत नाही, झालेल्या नुकसानीस पालिका प्रशासनच जबाबदार आहे, वेळीच आग विझली असती तर लाखो रूपयांची हानीच झाली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.