दिपक देशमुख – ९०२९५७९७३७
नवी मुंबई : शेतकर्यांच्या उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या एपीएमसीला सत्ताधार्यांनी सध्या राजकारणातील गुंड पोसण्याचे साधन बनविले असून त्या गुंडांच्या माध्यमातून व्यापारी आणि प्रामुख्याने माथाडी कामगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे. शेती मालावरील नियमन रद्द करून मार्केटमधील घटकांना रस्त्यावर आणण्यासाठी सरकार उताविळ झाले आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी खासदार राजु शेट्टी, खासदार शिवाजीराव आढळरावपाटील, आमदार विजय शिवतरे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये व्यापार्यांच्या व माथाडी कामगारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावळी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील व्यापार्यांची आणि माथाडी कामगारांची या तिन्ही मान्यवरांना भेटण्यासाठी एकच झुंबड उडाली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना राजु शेट्टी म्हणाले, मार्केटची अवस्था फार दयनीय आहे. सत्ताधारी मार्केटकडे फक्त पैसे कमविण्याचे साधन म्हणून पाहतात. येथील व्यापारी आणि माथाडी कामगारांना वार्यावर सोडण्यात आले आहे. या प्रचारफेरीमध्ये संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, वैभव नाईक, उपशहरप्रमुख रामदास पवळे, परशुराम ठाकूर, सर्जेराव यादव, दशरथ शिंगाडे, विभागप्रमुख विजय शेळके, उपविभागप्रमुख गणेश म्हांगरे, भगवान थोरात, सखाराम पाचपुते, बंटी चव्हाण, भिवराज शिंदे यांच्यासह शेकडो व्यापारी व माथाडी कामगार सहभागी झाले होते.