नगरः ‘मी कोणत्याही धमकीला घाबरत नाही. माझा विरोध व्यक्तीला नव्हे; तर प्रवृत्तीला आहे. देशाची मला चिंता असल्याने व्यभिचारी, भ्रष्ट व गुंड प्रवृत्ती लोकसभेच्या मंदिरात जाऊ नयेत, असे मला वाटते,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, खर्डा (ता. जामखेड) येथील ‘ऑनर किलिंग’ची घटना खेदजनक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
हजारे यांना नुकतेच धमकीपत्र आले असून, ‘पद्मसिंह पडले, तर तुमचा पवनराजे करू’, असे या पत्रात नमूद केले आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले, ’आतापर्यंत मला अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. माझ्यासमोर समाज व देश आहे. व्यभिचारी, भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीचे लोक लोकसभेच्या मंदिरात बसले तर देशाचे काय होईल, याची चिंता आहे.’
खर्ड्यातील दलित युवकाच्या हत्येची घटना खेदजनक व समाजाला कलंक लावणारी आहे, असे सांगून हजारे म्हणाले, ’मानवता हाच एक धर्म आहे. जात-पात-धर्म हे भेदभाव व्यक्तींनी घडविलेले नाहीत, तर राजकीय पक्षांनी घडविले आहेत. गावागावात भांडणे लावली, गट-तट पाडले गेले आहेत. त्यामुळे आता लोकांनी सावध होऊ विचार केला पाहिजे. जात-पात-धर्म सोडून मानवतेचा विचार केला पाहिजे,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.