नवी मुंबई :- शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारे यांचा २ लाख ८२ हजार मतांनी झालेला दणदणीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या राजकीय विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. शिवसेनेचे नेरूळ पश्चिमेतील प्रभाग ७७चे कार्यसम्राट नगरसेवक सतीश रामाणे यांच्या प्रभागातील विजयाबद्दल मतदारांचे आभार मानलेले फलक सोमवारी रात्री काही अज्ञात घटकांनी फाडल्याबद्दल वातावरणात काही प्रमाणात तणाव पसरला आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक सतीश रामाणे यांनी शिवसैनिकांना आणि विभागातील जनतेला शांततेचे आवाहन करताना फलक फाडणार्यांनी आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.
प्रभाग क्रं ७७ हा नेरूळ सेक्टर १६,१८,२४ या परिसराने बनलेला प्रभाग महापालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीपासून शिवसेनेच्या वर्चस्वाखाली आला आहे. तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेच्या विजय माने यांनी कॉंग्रेसचे मातब्बर नेते नामदेव भगत यांचा १२५ मतांनी पराभव करत या ठिकाणी सर्वप्रथम शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यानंतर चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार सतीश रामाणेंनी कॉंग्रेसचे तत्कालीन काशिनाथ पवार आणि राष्ट्रवादीचे गणेश भगत यांचे कडवट आव्हान मोडीत काढत पुन्हा एकवार या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यानंतर या प्रभागात नगरसेवक म्हणून सतीश रामाणेंनी जोरदारपणे काम करत शिवसेनेची पाळेमुळे स्थानिक भागातील घरादारापर्यत पोहोचविली आहेत. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत विकासकामे सातत्याने केल्याने नगरसेवक सतीश रामाणे या ठिकाणी जनाधाराच्या बाबतीत मातब्बर बनले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीत या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावूनही नगरसेवक सतीश रामाणे यांनी या प्रभागातून शिवसेना उमेदवार आमदार राजन विचारेंना तब्बल २२९० मतांची आघाडी मिळवून दिली आहे. इतक्या विक्रमी मतांनी आघाडी मिळवून दिल्याबद्दल मतदारांशी कृतज्ञता दाखविताना नगरसेवक सतीश रामाणेंनी फलक लावून आभार मानले होते.
नगरसेवक सतीश रामाणेंच्या माध्यमातून लोकांनी दाखविलेला विश्वास आणि निर्णायक आघाडी पचनी न पडलेल्या घटकांनी शिवसेनेचे आभाराचे फलक फाडताना खासदार राजन विचारेंचा व नगरसेवक सतीश रामाणेंचाही फोटो फाडला आहे. या भ्याड कृत्याचा नेरूळ सेक्टर १६,१८ आणि २४ मधील घराघरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भ्याड घटकांनी असे कृत्य करताना आमचे फोटो फाडले नाहीत तर स्थानिक जनतेने दिलेल्या निर्णयावरच हल्ला केला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नगरसेवक सतीश रामाणे यांनी व्यक्त केली आहे. ज्याला जनतेचा निर्णय मान्य नाही, त्यांना आगामी निवडणूकीत माझ्या प्रभागातील जनतेसमोर मते मागायला जाण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. स्थानिक मतदार हा होर्डीगवरील भ्याड हल्ला आगामी विधानसभा निवडणूकीतही कायम ठेवतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी असा इशारा नगरसेवक सतीश रामाणे यांनी दिला आहे.
दरम्यान विरोधकांनी अशी कृत्ये केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत अशा कृत्यातूनच आम्हाला आणि शिवसैनिकांना नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगून नगरसेवक रामाणेंनी गांधीगिरी दाखवित असे भ्याड कृत्य करणार्यांचेही आभार मानले आहेत.