नवी मुंबई : सिडकोने अंमलात आणलेल्या पारदर्शकतेच्या धोरणास अनुसरून नवी मुंबईतील सिडकोच्या अधिकार क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास कामांच्या सद्यस्थितीबाबतची सविस्तर माहिती सिडकोच्या ुुु. लळवले. ारहरीरीहींीर. र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अभियांत्रिकी विभागाच्या माहिती अंतर्गत जनहितार्थ उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक प्रकल्पाचे अवलोकन आणि मूल्यांकन करणे हाही प्रणालीचा उद्देश आहे. ही माहिती वेळोवेळी अद्यायावत करण्यात येईल.
माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या स्वरूपात एकूण ३१८ प्रकल्पांची माहिती जनतेसाठी खुली करण्यात आली आहे. या प्रकल्पातील सर्वात जुना प्रकल्प सीवूडस् रेल्वे स्थानक संकुल हा असून २४ जून २००८ रोजी त्याची निविदा मंजुर झाली आहे. नवी मुंबईत सध्या सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची माहितीसुद्धा पुरविण्यात आली आहे. रस्ते, पूल, मलनि:सारण व्यवस्था, पावसाच्या पाण्याच्या निचर्याची व्यवस्था या प्रकारच्या भौतिक सुविधांच्या कामांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
याखेरीज प्रत्येक प्रकल्पासाठी कोणत्या कंत्राटदाराची निविदा मंजूर झाली, ती केव्हा मंजुर झाली, प्रकल्प किती काळात पूर्ण होणार आहे आणि प्रकल्पाचा नियोजित खर्च किती आहे याबद्दलचे सविस्तर विवेचन या वेबसाईटवर उपलब्ध आहे. याखेरीज प्रकल्पाशी संबंधित सिडकोचा जबाबदार अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी यांचीही माहिती जनतेसाठी खुली करण्यात आली आहे.
सिडकोने आपल्या प्रशासनात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. माहितीचा अधिकार कायद्याची चोख अंमलबजावणी हा त्यातीलच एक भाग आहे. सिडकोने हल्लीच नियोजन विभागातर्फे देण्यात येणार्या बांधकामांबद्दलची माहिती वेबसाईटवर उपलब्ध केली आहे. यात पनवेल आणि उरण तालुक्यातील नवीन पनवेल, उलवे, कामोठे, द्रोणागिरी, कळंबोली, काळुंद्रे, गवाण, तळोजा पंचानंद आणि खारघर या गावातील इमारतींना ७ एप्रिल २०१४ पासून देण्यात आलेल्या बांधकाम प्रारंभ परवाना तसेच भोगवटा प्रमाणपत्र याबद्दलच्या माहितीचा समावेश आहे.
सिडको अधिकार क्षेत्रातील विविध उपयोगाच्या भूखंडांवरील बांधकामांना सिडकोच्या परवान्यांची आवश्यकता आहे. सिडकोचा परवाना नसलेली बांधकामे अनधिकृत ठरतात. त्यामुळे नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्याकरिता गृहनिर्माण क्षेत्रातील कुठलेही व्यवहार करताना ही माहिती तपासून घेणं गरजेचं आहे. अशा महत्वाच्या कागदपत्रांचं संगणकीकरण करण्याची प्रक्रीया सिडकोने सुरु केली आहे. यापुढे प्रत्येक आठवड्याला ही माहिती अद्ययावत करण्यात येईल.