नवी मुंबई शहराचा प्रारंभापासूनच २१व्या शतकातले शहर असा उल्लेख होत असून पुण्यापाठोपाठ विद्येचे माहेरघर म्हणून नवी मुंबईचाच उल्लेख होत आहे. नवी मुंबईत मुबलक प्रमाणात शैक्षणिक सुविधा असल्याने या ठिकाणी शिक्षण सम्राटही नावारूपाला आले आहेत. मात्र नवी मुंबईतील शिक्षणसम्राटांनी स्थानिक पातळीवरील राजकारणापासून स्वत:ला अलिप्तच ठेवत आपला व्यावसायिक बाणा कायम ठेवला आहे. नवी मुंबई सुशिक्षितांची नगरी असून सध्या नवी मुंबई फेसबुकच्या विळख्यात अडकली आहे असे म्हणणेदेखील अतिशयोक्तीचे ठरणार नाही. नवी मुंबईच्या राजकारण्यांनादेखील फेसबुकच्या रोगाची लागण झाल्याचे पहावयास मिळते. फेसबुक हे जनसंपर्काचे उत्तम माध्यम असले तरी राजकीय क्षेत्रातही फेसबुकचा अतिरेकी वापर होवू लागल्याने फेसबुकवर चमकेशगिरी करणार्या कार्यकर्त्याची नवी पिढी राजकारणास सक्रिय होवू लागली आहे.
नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात फेसबुक वापरणार्यांचा विचार करावयाचा झाल्यास मनसेचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. त्याखालोखाल शिवसेनेचा क्रमांक लागतो. कॉंग्रेसचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतपत काही घटक फेसबुकच्या आधीन गेलेले पहावयास मिळतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटकांना फारसे त्या तुलनेत फेसबुकचे व्यसन पहावयास मिळत नाही. गेल्या तीन-चार वर्षात फेसबुकवरील राजकीय जागर नवी मुंबईत वाढीस लागला आहे. लोकसभा निवडणूकीतदेखील नवी मुंबई कार्यक्षेत्रात फेसबुकने काही प्रमाणात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणूकीत मनसेचे नवी मुंबईत दणदणीत आणि खणखणीत पानिपत झाले असले तरी मनसेचे काही तकलादू चमकेश घटक फेसबुकवर आपली कोल्हेकुई करताना पहावयास मिळतात. शिवसेनेचे दाखले देत मनसेची ही मंडळी आपल्या पराभवाचे समर्थन करत आहेत. मुळातच शिवसेना आणि मनसे हे दोन स्वतंत्र पक्ष असतानाही नवी मुंबईतील मनसेची फेसबुकप्रेमी वारंवार शिवसेनेतील घडामोडीचा आधार घेत आहे. मनसेच्या फेसबुकवरील मंडळींचे अर्धवट राजकीय ज्ञान पावलापावलावर पहावयास मिळत आहे. चुकीची माहिती टाकायची अथवा चुकीची माहिती शेअर करायची. या माहितीवर कोणी टीका-टीपणी केली की ती कमेंट डिलीट करून टाकायची हाच एकमेव उद्योग मनसेतील फेसबुकप्रेमींचा दिवसभर असतो. मनसेच्या फेसबुकरील अज्ञानी मंडळींचा उद्योग मात्र नवी मुंबईकरांचे मनोरंजनच करत आहे. शिवसेनेचे काही पदाधिकारीदेखील फेसबुकच्या माध्यमातून आपली चमकेशगिरी करतच असतात. प्रत्यक्षात खासगी जीवनात आपल्या पक्षसंघटनेशी गद्दारी करून आपले आर्थिक उखळ पांढरे करून फेसबुकवर मात्र हीच मंडळी आपल्या पक्षसंघटनेवरील निष्ठेचे ढोल वाजविताना पाहिल्यावर त्यांच्यातील दुतोंडी भूमिकेबाबत संताप येणे स्वाभाविकच आहे.
काही चाणाक्ष मंडळी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपला राजकीय प्रचार करत असतात. आपण केलेल्या कामाची माहिती जनतेला देतात. समस्यांची जाणिव करून देताना आपण केलेल्या कामाची यादीदेखील स्थानिक जनतेला फेसबुकच्याच माध्यमातून सादर करत असतात. फेसबुक हे सोशल मिडीयातील जनसंपर्काचे उत्तम माध्यम आहे. मात्र अती केल्यावर माती ही होणारच. फेसबुकवरील राजकीय वाद नेहमीच विकोपालाही जाताना पहावयास मिळत आहे. मात्र फेसबुकवरील कार्यरत मंडळींचे कार्य संशोधनाचा विषय होत चालला आहे.