योगेश शेटे
नवी मुंबई : तीन दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी महेंद्र गवस या युवकाचा शोध लावण्यास नेरूळ पोलिसांना सतत अपयश येत असल्याने नेरूळ पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांकडून कमालीचा संताप व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे गवस कुटुंबावर दुःखाचे मोठे सावट पसरल्याने पोलिसांनी हा तपास वेगाने आणि योग्य दिशेने सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
महेंद्र नामदेव गवस हा नेरूळ सेक्टर १ येथील पंचशील अपार्टमेंट येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याचे वय २५ वर्ष असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. बुधवार दि.२१ मे या दिवशी सकाळी महेंद्र नामदेव गवस हा तरुण घराच्या बाहेर गेला असता मध्यरात्री पर्यंत घरी परतला नाही.त्यामुळे गुरुवार दि.२२ मे या दिवशी पहाटे अडीच वाजता त्याच्या कुटुंबीयांनी नेरूळ पोलिस ठाणे येथे जाऊन महेंद्र गवस हरविल्याची तक्रार नोंद केली. महेंद्रच्या अंगावर निळ्या रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पेंट असा पोशाख आहे.महेंद्रचा रंग गोरा,समोर सफेद केस,अंगाने सडपातळ,काळे डोळे,उंची ५ फुट आणि ४ इंच असे त्याचे एकंदरीत वर्णन आहे. गुरुवार दि.२२ मे ला महेंद्र गवस हरविल्याची तक्रार नेरूळ पोलिस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर तीन दिवसांचा काळ उलटून गेला तरी महेंद्रचा पोलिसांना काहीच थांगपत्ता लागत नाही आहे.तसेच पोलिस महेंद्रचा तपास पाहिजे तसा वेगाने आणि योग्य दिशेने करत नसल्याने आणि पोलिस महेंद्रच्या कुटुंबियांना नेहमी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महेंद्र गवसचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभागाचे नवी मुंबई शहर चिटणीस गणेश पालवे यांनी नेरूळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता शिंदे यांची गुरुवार दि. २२ मे या दिवशी सायंकाळी भेट घेऊन पोलिसांनी महेंद्राचा तपास वेगाने आणि योग्य दिशेने करावा अशी मागणी सुद्धा केली आहे. त्यामुळे महेंद्रचा शोध कुणाला लागताच तात्काळ ९५९४६५१६१२ / ९८७०२५०३८७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.