नवी मुंबई : अनेक तरुण-तरुणींना पोलिस बनण्याची इच्छा असते परंतु पोलिस भरतीत जाण्याची इच्छा बाळगणार्या आणि कठोर प्रयत्न करण्याची तयारी असणार्या तरुण-तरुणींना तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळतेच असे नाही. म्हणूनच अनेक जणांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते. त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची ही गरज ओळखून पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती’ रोजगार, व्यापार व उद्योग समिती मार्फत मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपासून ते ३१ मे पर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेत रा.फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे, सेक्टर ८, नवी मुंबई याठिकाणी या मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या बेरोजगारीच्या पोर्शभूमीवर पोलिस भरती हा बेरोजगार तरुणांसाठी आशेचा किरण आहे. या सहा दिवसीय पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरामध्ये तरुण-तरूणींसाठी मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्याकडून मैदानी खेळांचाही सराव करून घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थी लेखी परीक्षेत कमी पडू नयेत याची काळजी घेत लेखी परीक्षेसाठीही प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. हे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण अगदी मोफत आहे. यामुळे नवी मुंबईतील तरुण-तरुणींना हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. याचा जास्तित जास्त तरुण आणि तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. संदीप नाईक यांनी केले आहे. या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीरात गोळा फेक, लांब उडी, १०० मी. धावणे, ३/५ किमी. धावणे, पुलप्स आदी मैदानी
खेळांचा तरुण-तरूणींकडून सराव करुन घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीराबद्दल अधिक माहितीसाठी ८८२८८४०००० या क्रमांकावर संपर्क साधावा.