* आ.संदीप नाईकांचा सिडकोला खणखणीत इशारा
*विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सिडको, एमआयडीसी, कोकणभवनला सादर
* राजकारण बाजूला सारुन सर्व घटकांना एकजुटीचे आवाहन
नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा २.५ एफएसआयच्या माध्यमातून पुनर्विकास, प्रकल्पग्रस्तांनी गावठाण विस्तारात केलेली बांधकामे नियमित करणे, गरजेपोटी बांधलेली घरे ही मूळ गावठाणांहून २०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळाऐवजी ५०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळापर्यंत नियमित करावीत, ४ एफएसआयच्या माध्यमातून एसआरआय अंतर्गत शहरातील झोपडपट्टीतील बांधकामे नियमित करुन पुनर्वसन योजना तातडीने मंजूर करणे, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत किंवा अल्पदरात शालेय शिक्षण देणे, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सिडकोच्या सेवेत सामावून घेणे आदी प्रलंबित समस्यांची पूर्तता येत्या आठवडाभरात न झाल्यास २ जून रोजी सिडको भवन, एमआयडीसी आणि कोकणभवन मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, तसेच प्रकल्पग्रस्त नागरिकांनी दिला आहे.
सोमवारी आ.संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लेखी निवेदन सादर केले. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. सिडकोशी संबंधित मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी याप्रसंगी केले आहे. शासनाशी संबंधित मागण्यांचे निवेदन कोकणभवन मुख्यालयात महसूल खात्याचे उपायुक्त श्री. बोडखे यांना देण्यात आले तर एमआयडीसीशी संबंधित मागण्यांचे निवेदन एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर कृष्णा जाधव यांना देण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक हे नवी मुंबईतील नागरिकांच्या सिडकोविषयक महत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नाने अनेक समस्यांची यशस्वीपणे सोडवणूक देखील झाली आहेत. माजी खा. संजीव नाईक यांनी देखील केंद्र सरकारच्या स्तरावर अनेक प्रश्न मांडले व त्याची सोडवणूक केली. त्याचबरोबर आ.संदीप नाईक यांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात राज्य सरकारकडे सातत्याने सिडकोविषयक प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी आवाज उठविला आहे. सिडको आणि सिडकोचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने सिडकोकडील महत्त्वाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. राज्य सरकार आणि सिडकोकडे सातत्याने प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. परंतु असंतुष्ट आणि विकास कामात खो घालण्याच्या काहीजणांच्या वृत्तीमुळे सर्वसामान्यांच्या समस्या सुटल्या नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
अखेरचा पर्याय म्हणून सोमवारी (ता.२६-मे) सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आल्याचे आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रकारांना सांगितले.
सिडको संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीपासून ते आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकांची माहिती सिडकोचे अध्यक्ष हिंदुराव यांना आ.संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी दिली. या अविरत पाठपराव्यामुळे राज्य सरकारने १ मे २००७ रोजी एक अध्यादेश काढून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा आदेश दिला आहे. मात्र सिडकोने या आदेशाची अंमलबजावणी आत्तापर्यंत का केली नाही? असा खडा सवाल आमदार संदीप नाईक यांनी केला. गरजेपोटी बांधलेली घरे ही मूळ गावठाणांहून २०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळाऐवजी ५०० मीटर परिघाच्या क्षेत्रफळापर्यंत नियमित करावीत, गावठाणातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करावी, साडेबारा टक्के भूखंड वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, सिडको निर्मित धोकादायक इमारतींचा २.५ एफएसआयच्या माध्यमातून पुनर्विकास करावा, नवी मुंबई महानगरपालिकेने सिडको निर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी तयार केलेला ऍसेंसमेंट प्लॅनला मंजुरी द्यावी, नवी मुंबईतील प्रत्येक नोडमध्ये सिडकोने सर्व धर्मियांसाठी प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आणि कब्रस्तानसाठी जागा द्याव्यात, सिडकोच्या औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सिडकोच्या सोसायटयांच्या जमिनी फ्री होल्ड कराव्यात, गावठाण विस्तारातील गरजेपोटी बांधलेली वाणिज्यिक बांधकामे नियमित करावीत, रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे, गावालगत जागा घेऊन बांधलेली घरे ऐरोलीतील शिवकॉलनीच्या धर्तीवर नियमित करावीत, पात्रतेतून वजा केलेले भूखंड प्रकल्पग्रस्तांना नवीन जागेत द्यावेत, सिडकोकडील आरक्षित सुविधा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे तातडीने हस्तांतरित करावेत, सिडकोकडील सामाजिक वापरासाठीचे भूखंड निविदा न काढता प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना प्राधान्याने द्यावेत, प्रकल्पग्रस्तांना नवीन केंद्रीय पुनर्वसन कायद्यानुसार बाजारभावाच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून अदा करावी, मिठागर कामगार, बारा बलुतेदार आणि भूमिहीन शेतकरी यांना तातडीने भूखंडांचे वाटप करावे, प्रकल्पग्रस्त, माथाडी आणि इतर कष्टकरी घटकांना नवी मुंबई परिसरात ३५०-४५० चौरस
फूट क्षेत्रफळाची तयार घरे अथवा घरांसाठी जमिनी तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात, सिडकोकडील घणसोली नोड तातडीने विकसित करुन तो महापालिकेकडे हस्तांतरित करावा, नवी मुंबईतील सर्व नोडमध्ये सिडकोने खेळांसाठी मैदाने उपलब्ध करुन द्यावीत आदी मागण्या सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याकडे मांडून त्यावर चर्चा करण्यात आली. २ जून रोजी काढण्यात येणार्या मोर्चादरम्यान इतर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात येणार असून विभागनिहाय मागण्या देखील मांडण्यात येणार आहेत.
सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी या प्रलंबित मागण्यांबाबत आजच सोमवारी अधिकारी वर्गाच्या होणार्या बैठकीत चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सिडको प्रशासनाने अनेक विकास कामांत हेळसांड केली असल्याचेही यावेळी हिंदुराव यांनी मान्य केले. येत्या आठवडाभरात शासन स्तरावर आपण स्वत: यापुढे या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. आमदार संदीप नाईक यांनी पाठपुरावा केल्यामुळे घणसोलीमधील १५,२१ आणि २३ क्रमांकांच्या नोडमध्ये सिडको लवकरच विकास कामे हाती घेणार आहे. सिडकोअंतर्गत या क्षेत्रात २० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून ती लवकर सुरु होणार असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी बैठकीत सांगितले.
* राजकारण बाजूला ठेवून सर्व घटकांनी एकत्र यावे
नवी मुंबईतील सिडकोविषयक अनेक समस्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. शहरात अनेक ठिकाणी सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यात अनेक निष्पाप नागरिक जखमी झाले आहेत. नवी मुंबईतील जनतेच्या सर्व प्रलंबित प्रश्नांविषयक आस्था असणार्या सर्व घटकांनी याची सोडवणूक करण्यासाठी राजकारण बाजूला सारुन विकासाचा दृष्टीकोन सोबत घेऊन एकत्र येण्याचे आवाहन आ.संदीप नाईक यांनी केले आहे.