मनविसे सांस्कृतिकची शिक्षणाधिकार्यांकडे मागणी
नवी मुंबई – प्रवेश प्रक्रीयेपुर्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार्या शाळांना लगाम घाला अशी मागणी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक विभागाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांनी शिक्षणाधिकार्यांकडे लेखी निवेदन पत्र देवून केली आहे. यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहर अध्यक्ष गिरीराज दरेकर, शहर चिटणीस गणेश पालवे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष सचिन सणस, उपविभाग अध्यक्ष सचिन बाबर, शाखा अध्यक्ष अजित हाके आदी मनविसे सांस्कृतिकच्या पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
नेरूळ सेक्टर १८ येथील पुणे विद्याभवन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोठ्या शिशूच्या वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेवेळी शालेय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याच्या तक्रारी पालकांनी मनविसे सांस्कृतिकचे ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांच्याकडे केल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार्या शाळांवर नवी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाने कायदेशीर कारवाई करून लगाम घालण्याची मागणी आज निवेदन पत्र देऊन केली. यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनविसे सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ हजर होते. तसेच हा प्रकार तात्काळ थांबला नाही तर मनविसे सांस्कृतिक विभाग आपल्या मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करेल असा इशारा ठाणे लोकसभा अध्यक्ष अमर पाटील यांनी यावेळी दिला.