योगेश शेटे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे हे आपल्या विनम्र स्वभावामुळे नेरूळ नोडमध्ये प्रसिध्द आहेतच, त्यांचा सर्वत्र असलेला परिचय, दांडगा जनसंपर्क, अजात शत्रूची प्रतिमा यामुळे मांडवेंची वाढती लोकप्रियता विरोधकांसाठी गेल्या काही महिन्यापासून असूयेचा विषय बनली आहे. मांडवेंच्या विकासकामांमध्ये ‘खो’ घालण्याचे षडयंत्र उघडकीस आल्याने मांडवेंच्या प्रभागातील राजकीय दबावामुळे रखडवलेला ‘हायमस्ट’ आणि त्यातून मांडवेंना केला जाणारा त्रास हा पश्चिम महाराष्ट्रातील नेरूळस्थित जनतेमध्ये संतापाचा विषय बनला आहे. नेरूळ सेक्टर आठमधील ग्लोरी बुक सेंटर व गोल्डन गेटसमोरील दिवाळीपासून पडलेला हायमस्ट हा येत्या ऑक्टोबर महिन्यात येवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत राजकीय ‘ब्लास्ट’ करण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे हे कामामुळे स्थानिक प्रभागातील रहीवाशांमध्ये कमालीचे लोकप्रिय असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी प्रभागातच ठाण मांडून पालिका निवडणूकीच्याधर्तीवर घरटी प्रचार केला. मांडवेंचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला ते थेट पेव्हर ब्लॉक, माथाडींच्या वसाहतीला संरक्षक भिंत आदी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. मांडवेंची प्रतिमा मलीन करण्यासाठी खालच्या पातळीचे षडयंत्रदेखील वेळोवेळी रचण्यात आले. पण स्थानिक जनता या षडयंत्राला बळी न पडल्याने मांडवेंच्याच मागे उभी राहील्याचे लोकसभा निवडणूकीत पहावयास मिळाले. मांडवेंच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधातील स्थानिक मंडळींना बाजूच्या प्रभागातील नगरसेवकासह सातत्याने बोनकोडेकरांचेही सहाय्य घ्यावे लागल्याने बोनकोडेकरही गेल्या काही महिन्यापासून मांडवेंच्या प्रभागात सातत्याने पायधूळ झाडू लागले आहेत. नेरूळ सेक्टर सहा परिसर आणि सारसोळे गावातील समस्या निवारणासाठी पालिका ते मंत्रालय कार्यरत असलेल्या बोनकोडेकरांनी पाहणी अभियान राबवावे यासाठी कॉंग्रेसच्या मनोज मेहेर यांनी तक्रारींचा रतीब घालूनही बोनकोडेकरांची वाहनांना अद्यापि नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावचा रस्ता पाहणी अभियानासाठी आजतागायत दिसलेला नाही.
शिवसेना नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या प्रभागाकरीता तीन हायमस्ट मंजूर झाले असून त्यापैकी दोन हायमस्ट बसवूनही झाले आहेत. तथापि नेरूळ सेक्टर आठमधील ग्लोरी बुक सेंटर व गोल्डन गेटसमोरील हायमस्ट विरोधकांनी राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनविल्याने व पालिका प्रशासन संबंधितांच्या दबावाला झुकल्याने हा हायमस्ट वर्क ऑर्डर निघूनही अद्यापि बसलेला नाही. दिवाळीपासून तो हायमस्टच्या जागेवरील फाऊंडेशन आणि हायमस्टचा पाईप तसाच पडून आहे. स्थानिक मतदार याबाबत नगरसेवक मांडवेंना सातत्याने विचारणा करत आहेत आणि सत्य परिस्थिती समजल्यावर ‘मांडवेसाहेब, येत्या विधानसभा निवडणूकीत याचे उत्तर आपण देवू’ इतके सांगून निघून जात आहे.
वर्क ऑर्डर निघूनही हायमस्ट अद्यापि बसलेला नाही. शिवसेना नगरसेवक रतन मांडवेंनी पालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकार्यांना विचारणा केल्यावर ते एका नगरसेवकाचे व पालिका प्रशासनात सक्रिय असलेल्या एका मातब्बर राजकारण्याचे नाव रखडलेल्या हायमस्टप्रकरणाशी घेत आहे. संबंधित नगरसेवकांने त्याच हायमस्टसमोेरील रस्त्यावर काही अंतरावर हायमस्टची मागणी केली होती. तो काही कारणास्तव रखडला. तथापि मांडवेंचा ग्लोरी बुक सेंटर व गोल्डन गेटसमोरील जागेवरील हायमस्ट मंजूर होवून वर्क ऑर्डरही निघाल्याने तेथून पुढे राजकीय दबावनाट्यास सुरूवात झाली.
एका नगरसेवकाच्या व पालिका प्रशासनाता सक्रिय असलेल्या एका मातब्बर राजकारण्यांमुळे ग्लोरी बुक सेंटर व गोल्डन गेटसमोरील हायमस्ट रखडल्याचे प्रकरण नुकतेच शिवसेना नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली असता उघडकीस आले. यावेळी अन्य शिवसेना नगरसेवकांनाही हा प्रकार समजला. या प्रकरणामुळे घडलेल्या वादाचे लोण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयापर्यतही पोहोचले असून त्याठिकाणीदेखील तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पालिका आयुक्तांनी याबाबत संबंधित पालिका अधिकार्यांना फैलावर घेतले असून हायमस्टप्रकरणी झालेला प्रकार शिवसैनिकांनाही आता समजला आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर हायमस्ट न बसविल्यास क्रेन आणून हायमस्ट बसविण्याची तयारी शिवसेनेच्या काही मातब्बरांनी सुरू केली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि शिवसेना युवा नेेते वैभव नाईक हेदेखील हायमस्टच्या घडामोडीवर लक्ष ठेवून असून विधानसभा निवडणूकीत हायमस्टचा मुद्दा नेरूळ पश्चिमेला घरटी प्रचाराचा मुद्दा शिवसेनेकडून बनविला जाण्याची शक्यता आहे.