* उपनेते विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखेच प्रबळ दावेदार
सुजित शिंदे
नवी मुंबई : चार महिन्यावर येवू घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईत ४७ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाल्याने ऐरोली व बेलापूर विधानसभा लढविण्यासाठी अनेकांच्या महत्वाकाक्षांना नव्याने धुमारे फुटू लागले आहेत. ऐरोलीमध्ये जिल्हाप्रमुख विजय चौगुले व युवा नेते वैभव नाईक या दोन नावाची चर्चा असली तरी बेलापूर मतदारसंघामध्ये अधिक नावांची चर्चा होत आहे. चर्चा अनेकांची होत असली तरी प्रामुख्याने शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे या दोघांपैकी एकालाच तिकीट मिळणार असल्याचे शिवसेनेमध्ये चर्चिले जात आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल २७ हजाराचे मताधिक्य, कॉंग्रेसच्या स्थानिक घटकांशी असलेला दुरावा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रणरागिनी-मुलुखमैदानी तोफ मा. आमदार मंदाताई म्हात्रेंचा सध्याचा आक्रमक पावित्रा, मोदी लाटेचा आजही वाढता आलेख, राज्य शासनाच्या विरोधातील नाराजी ‘कॅश’ करण्यासाठी शिवसेनेच्या छावणीत विधानसभा लढविण्यासाठी इच्छूकांची संख्या वाढू लागली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखेंसह काही पदाधिकार्यांसह नगरसेवकांचीही इच्छूकांमध्ये चर्चा होत आहे. विजय नाहटा यांना संघटनेतील उपनेते हे मातब्बर पद देवून शिवसेना नेतृत्वाने त्यांचा गौरव आधीच केल्याने त्यांचा संघटनात्मक कामाकरीता अधिक वापर व्हावा यासाठी शिवसेनेकडून विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची अधिक शक्यता वर्तविली जात आहे.
सध्याचा जनसामान्यांचा राज्य सरकारवरील प्रक्षोभ पाहता बेलापूरातील शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास आमदारकी पक्कीच हे समीकरण सध्या स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या छावणीत रूजू लागले आहे. नवी मुंबई शिवसेनेतील काही नगरसेवकांसह पक्षीय पदाधिकार्यांनाही आयाराम-गयारामचे लेबल लागलेले आहे. विजय नाहटा हे संघटनेत नव्याने आलेले आहेत. ना. गणेश नाईकांसारख्या मातब्बरापुढे विजय नाहटा यांना थेट निवडणूक रिंगणात न उतरविता त्यांचा प्रशासन सांभाळण्याचा अनुभव पाहता ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचार अभियान सांभाळण्यास सांगण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे.
ऍड. मनोहर गायखे हे शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख असले तरी दादरमधील शिवसेना भवन आणि मातोश्रीशी गेल्या अनेक वर्षापासून त्यांची इतरांच्या तुलनेत अधिक जवळीक आहे. उच्चविद्याविभूषित आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना संघटनेशी निष्ठावंत असा ऍड. गायखेंचा संघटनात्मक पातळीवर नावलौकीक आहे. स्थानिय लोकाधिकार समिती, विमा कर्मचारी सेना, कामगार क्षेत्र, रिक्षा संघटना, वृत्तपष विक्रेता संघटना आदी शिवसेनेच्या संलग्न संघटना सांभाळण्यातही ऍड. गायखेंनी सातत्याने गेल्या काही वर्षापासून परिश्रमाची शिकस्त केलेली आहे. शिवराळ भाषेचा कोणताही शिक्का अँड. गायखेंवर नाही.
संघटनात्मक पातळीवर गेल्या अनेक वर्षापासून केलेले प्रामाणिकपणे परिश्रम, शिवसैनिकांशी सलगी, बोनकोडेशी कधीही न साधलेली जवळीक, आयाराम-गयाराम शिक्का नसणे, मद्यपि ही प्रतिमा नसणे, उच्चविद्याविभूषित आदी बाबींचा विचार केल्यास विधानसभा निवडणूकीत अन्य इच्छूकांच्या तुलनेत ऍड. मनोहर गायखेंचे पारडे सध्या तिकीटाच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. अन्य इच्छूक उमेदवारांवर आयाराम-गयारामचा असलेला शिक्का, शिक्षणाचा अभाव, सार्वजनिक ठिकाणी सर्रास शिवराळ भाषेचा वापर, सुसंस्कृतपणाचा अभाव आदी बाबींची जवळीकता असल्याने शिवसेनेच्या ‘थिकींग टँक’ला याचा विचार करावाच लागणार आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात ऐरोलीच्या तुलनेत सुशिक्षित मतदारांची संख्या अधिक आहे. सुशिक्षित मतदारांपुढे जाताना, इंग्रजीशी सुसंवाद साधताना, आपली बाजू मांडताना स्वच्छ प्रतिमा आणि शिक्षण याही बाबी महत्वपूर्ण ठरणार आहेत. ऍड. गायखेंची लोकसभा निवडणूकीतही इच्छूकांमध्ये चर्चा होती. ना. गणेश नाईकांच्या पश्चात संघटनेची पडझड सांभाळताना ऍड. गायखे यांनी खस्ता खालेल्या असल्याने विधानसभा निवडणूकीत त्यांचा प्राधान्यांने विचार करावा असा सूर अधिकांश शिवसैनिकांकडून आळविला जात आहे.