* हरित नवी मुंबई आमदार संदीप नाईकांचा संकल्प
नवी मुंबई : ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईला हरित नवी मुंबई करण्याचा प्रयत्न वृक्षारोपण मोहिमांतून गेले काही वर्षे सातत्याने सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे. ग्रीन होपच्यावतीने आज जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने रबाळे येथील मुंबादेवी डोंगरावर वृक्षारोपण मोहीम आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आपल्या परिसरातच निसर्ग फुलवा जेणेकरुन विद्यार्थी आणि युवकांना त्यापासून निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळेल, अशी सूचना याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.नाईक यांनी केली.
माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे, नगरसेविका गौतमी सोनावणे आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आजच्या वृक्षारोपण मोहिमेप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंगर भागात आवश्यक असणारी चिकू, बदाम, जांभूळ, संत्रे या फळांची वृक्षरोपे लावण्यात आली. या मोहिमेचा जाहीर कार्यक्रम रबाळेतील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात पार पडला. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा अव्याहतपणे वापर केला. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. अवेळीचा पाउस, पूर, गारपीट, दुष्काळ अशी संकटे एकामागून एक येत आहेत. या अवर्षणांना रोखायचे असले तर निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. लावलेली वृक्षरोपे जगण्यासाठी आधुनिक सिंचन पध्दती अंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली. केवळ वृक्षारोपण करणे महत्वाचे नसून लावलेली वृक्षरोपे कशा प्रकारे जगतील आणि वाढतील याची काळजी घेणे देखील तितकेच अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
निसर्गावर प्रेम करणारे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रेरणेतून नवी मुंबईत वृक्षसंवर्धनाची मोहीम रुजली आणि वाढली असल्याने सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील नक्षत्र उद्यान हे त्याचेच एक उदाहरण असल्याचे सांगून या उद्यानात विविध जातींच्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरु असतो. या उद्यानामुळे येथे येणार्या पक्ष्यांच्या संख्येत भर पडली असून येथील निसर्ग नितांतसुंदर बनला आहे, असे ते म्हणाले. ग्रीन होपच्या वतीने पुढील एका महिन्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, सोसायट्या, कारखाने आदींना वृक्षारोपणासाठी मोफत वृक्षरोपे हवी असल्यास त्यांनी ०२२-२७८११०५२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रेरणेने व आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन होप संस्था २००७ पासून नवी मुंबईत निसर्गरक्षणाचे बहुमोल कार्य करीत आहे. संस्थेने आजवर २००८ साली एक लाख वृक्षारोपण मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत सुमारे २० हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. २००९ साली दोन लाख वृक्षारोपण मोहिम पार पडली. खारफुटींचे रोपण हे २००९ सालच्या मोहिमेचे वैशिष्टय होते. तसेच विविध ठिकाणी वाटप केंद्रामार्फत रोपटयांचे मोफत वाटप करण्यात आले. २०१० साली ग्रीन मुव्हमेंट २०१० अंतर्गत दोन लाख वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धन व स्वच्छ-हरित नवी मुंबई या विषयांवर आधारित चित्रकला, घोषवाक्य, छायाचित्र, लेखन आणि निबंध या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जेणेकरुन सर्व नागरिकांना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपले योगदान देता येईल. या आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ २०११ सालच्या ग्रीन मिशन २०११ अंतर्गत साजरा करण्यात आला.
२०१२ मध्ये पर्यावरणाचा संदेश शहरातील प्रभागा-प्रभागांत पोहचविण्यासाठी प्रभाग स्तरावर वृक्षारोपणाची मोहिम राबविण्यात आली होती. नंतर म्हणजेच २०१३ साली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहिम २०१३ अंतर्गत विविध शाळा-महाविद्यालयीन परिसर, मैदाने तसेच औद्योगिक क्षेत्र अशा ठिकाणी पर्यावरण रक्षणाचे फलके दर्शवून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या हजारो रोपटयांचे मोफत वाटप करण्यात आले.
ग्रीन होप संस्थेमार्फत वृक्षारोपण आणि वृक्षरोपे वाटपाबरोबरच वृक्षांचे संवर्धन कसे करावे या बाबतचे मार्गदर्शन वेळोवेळी दिले जाते. संस्थेमार्फत लावलेली झाडे जगविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविले जातात. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कारखाने, डोंगर, सार्वजनिक ठिकाणे आदी सर्व ठिकाणी तेथे आवश्यक असणारी झाडे लावली जातात. डोंगरावर मातीची धूप थांबविणारी तर रस्ते, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी शीतल छाया देणारी तसेच शोभेची झाडे लावली जातात. खाडीकिनारी सागरी जीवसृष्टीसाठी संजीवनी ठरणार्या आणि पुरापासून परिसराचे संरक्षण करणार्या खारफुटींच्या झाडांचे रोपण करण्यात येते. औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांधून होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी वृक्षारोपण मोहिमेंतर्गत कंपन्यांच्या परिसरात पर्यावरणाचा समतोल राखणारी वृक्षरोपे लावण्यात येतात. आमदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबध्दरित्या ही वृक्षारोपण मोहीम दरवर्षी पार पडत असते. या मोहिमेुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना नवी मुंबईत जपली जाते.