नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून तुर्भे सेक्टर २१ मधील नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानाचा विकास रखडला असल्याने नागरिकांना उद्यानातील असुविधामुळे उद्यानापासून नेहमी वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी मोठी गैरसोय लक्षात घेऊन मंगळवार दि.९ जून या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुर्भे विभाग अध्यक्ष सुनिल तुकाराम पाटील यांनी नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आबासाहेब जर्हाड यांना महानगर पालिका प्रशासनाने उद्यानाचा तात्काळ विकास न केल्यास पालिका प्रशासनाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनपत्र देऊन दिला आहे.
तुर्भे सेक्टर २१ येथे नवी मुंबई महानगर पालिकेच्या मालकीचे एकमेव उद्यान आहे.परंतु,या उद्यानाची महानगर पालिकेच्या उदासीनतेमुळे फार मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून उद्यानात ये-जा करणार्या नागरिकांची दिवसेंदिवस प्रचंड गैरसोय होत चालली आहे.तसेच उद्यानातील नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याने नागरीकामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.उद्यानाचे नामफलक नसल्याने उद्यानाच्या नामकरणाविषयी नागरिक संभ्रमात आहेत.उद्यानाचा मुख्य लोखंडी प्रवेशद्वार आणि उद्यानाच्या लोखंडी संरक्षण जाळ्या चोरीला गेल्या आहेत.त्यामुळे उद्यानात मुक्या प्राण्यांचा वावर वाढला असून प्राण्यांकडून उद्यानातील गवतांची आणि झाडांची नासधूस मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तसेच उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर खडी,रेती आणि डेंब्रीज टाकण्यात आले आहे.त्यामुळे उद्यानात ये-जा करणार्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उद्यानातील खेळणी तुटली असल्याने उद्यानात खेळ खेळणार्या लहान मुलांच्या अंगाला गंभीर दुखापत होण्याच्या घटना सतत घडत आहेत. उद्यानातील पदपथाची मोठी दुरवस्था झाली असून पदपथावरील लाद्या उखडल्या गेल्या आहेत.त्यामुळे पदपथावरून चालताना किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. उद्यानात पथदिव्यांचा मोठा अभाव असल्याने उद्यानातील उच्च प्रकाश क्षमतेच्या दिव्याचा प्रकाश उद्यानात सगळीकडे पसरत नाही आहे.त्यामुळे उद्यानात काही ठिकाणी अंधार पसरत असल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उद्यानात सुरक्षा रक्षक नेमला गेला नसल्याने उद्यानातील पालिकेच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे. उद्यानात पिण्याच्या पाण्याची आणि निवारा शेडची कोणतीच व्यवस्था नसल्याने उकाड्याच्या काळात दुपारी फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणार्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत चालली आहे. तसेच उद्यानात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही महानगर पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असमर्थता दाखविण्यात आली आहे.त्यामुळे आजही उद्यानातील नागरिकांच्या समस्या प्रलंबित आहेत.यापूर्वीही मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी उद्यानातील नागरिकांच्या समस्या महानगर पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी स्वतः महानगर पालिकेच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना सोबत घेऊन उद्यानातील डेंब्रीज हटविले होते.तसेच यापूर्वीही मनसे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी महानगर पालिकेच्या अधिकार्यांसोबत या उद्यानाचा पाहणी दौरा करून उद्यानातील नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता.परंतु, महानगर पालिकेच्या उदासीनतेमुळे या उद्यानाला नेहमी बकालपणाचे स्वरूप प्राप्त झाले. पालिकेच्या उदासीनतेमुळे उद्यानातील नागरिकांच्या समस्यांमध्ये अधिक भर पडत गेल्याने नागरिकांकडून नाराजीचा मोठा सूर आळविला जात आहे.त्यामुळे मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात उद्यानाच्या प्रश्नाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून उद्यानाचा तात्काळ विकास न केल्यास पालिका प्रशासनाविरोधात मनसे स्टाईलने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.