* आ. संदीप नाईक यांची औचित्याच्या मु्द्याद्वारे मागणी
नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबईतील विविध धर्मियांनी सिडको व एमआयडीसीकडे अत्यावश्यक बाबींसाठी भूखंडांची मागणी केली असून ते त्यांना त्वरीत वितरीत करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी गुरूवारी आ. संदीप नाईक यांनी आज विधानसभेत एक औचित्याच्या मुद्दयाद्वारे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्याकडे केली.
आ. संदीप नाईक म्हणाले की, नवी मुंबईत हिंदू, मुस्लिम,शीख, ख्रिश्चन, बौध्द आदी विविध धर्मांचे नागरीक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या विभागात प्रार्थनास्थळे, मंदिरे, स्मशानभूमी, मसजिद, कब्रस्तान, शाळा, स्वच्छतागृहे यासाठी सिडको व एमआयडीसीकडे अनेक वर्षांपासून भूखंडांची मागणी केली आहे. मात्र त्यांना अद्यापपर्यंत भूखंड मिळाले नसून भूखंडाचे वाटप प्रलंबित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सदरचे भूखंड संबंधित समाजाच्या नागरीकांना त्यांनी केलेल्या मागणीनुसार तत्काळ वितरीत करण्याच्या सूचना सिडको व एमआयडीसीला द्याव्यात.