* शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांची माहिती
नवी मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले नेरूळ सेक्टर १८ येथील मॉंसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मंडई मार्केट नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले होणार असल्याची माहिती स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांनी दिली. त्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने २००५ साली नेरूळ सेक्टर १८ येथील भूखंड क्र.१५ ए हा भूखंड फेरीवाला मार्केटसाठी आरक्षित केला होता.परंतु, नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून या भूखंडाचा विकास करण्यास सतत उदासीनता दाखवली जात असल्याने स्थानिक गोर गरीब फेरीवाल्यांना त्यांच्या हक्काच्या फेरीवाला मार्केटपासून नेहमी वंचित रहावे लागत होते.त्यामुळे रस्त्यावर आणि पदपथावर भाजी आणि फळ विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणार्या स्थानिक गोर गरीब फेरीवाल्यांना महानगर पालिकेच्या कारवाईचा सतत बळीचा बकरा बनावा लागत होते. महापालिकेच्या कारवाईचा फेरीवाल्यांच्या व्यवसायांवर मोठा परिणाम होत असल्याने फेरीवाल्यांचे जगणे हालाखीचे झाले होते.२००९ साली तत्कालीन शिवसेना नगरसेवक विजय माने यांनी पालिका प्रशासनापुढे फेरीवाला मार्केटचा प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवली होती. फेरीवाला मार्केटला मंजुरी मिळाल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून फेरीवाला मार्केटचा विकास रखडला गेला होता. त्यानंतर नेरूळ सेक्टर १८ येथे पदपथावर एकेकाळी भाजी विक्रीचा व्यवसाय करणार्या गरीब घराण्यातील शिवसेनेचे स्थानिक विद्यमान नगरसेवक सतिश रामाणे यांना पदपथावरच भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करणार्या फेरीवाल्यांच्या भावना आणि वेदना कळत असल्यामुळे त्यांनी फेरीवाला मार्केटसाठी पालिका प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला.शिवसेना नगरसेवक सतिश रामाने यांनी फेरीवाला मार्केटसाठी पालिका प्रशासन दरबारी आपल्या चपला झिजवून मोठा संघर्ष केला.त्यानंतर पालिका प्रशासनाला शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांच्या संघर्षापुढे अखेर नमती भूमिका घेऊन फेरीवाला भूखंडाचा विकास करून तेथे फेरीवाला मार्केट उभारावे लागले.शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांच्या अथक प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या या मॉंसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मंडई मार्केटला अंदाजे सव्वा कोटींच्या जवळपास खर्च करण्यात आला असून या फेरीवाला मार्केटचा लाभ स्थानिक गोर गरीब फेरीवाल्यांना घेता येणार आहे.त्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांकडून आणि नागरिकांकडून सतिश रामाणे यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.