* मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश
नवी मुंबई :: पोलीस भरतीदरम्यान चार उमद्या तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पोलीस दलाला जाग आली आहे. ‘यापुढील भरती प्रक्रिया भर उन्हात घेऊ नका,’ असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी संबंधितांना दिले आहेत.
मुंबई पोलीस दलातील भरतीसीठी द्याव्या लागणार्या मैदानी परीक्षेच्या दरम्यान विक्रोळी व नवी मुंबईतील भरती केंद्रावर गेल्या आठवड्याभरात चार उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यामुळे या भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलीस दलाविरोधात प्रचंड संताप खदखदत होता. याची दखल घेऊन राकेश मारिया यांनी शनिवारी विक्रोळी येथील भरती केंद्राला भेट दिली. येथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मारिया यांनी भरती प्रक्रिया उन्हात न घेण्याचे आदेश दिले.
उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळी घ्या. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी योग्य ती जागा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना मारिया यांनी दिल्या. भरती प्रक्रियेविषयी उमेदवारांच्या तक्रारी असतील तर त्यांची नोंद करून घ्या, असे आदेशही मारिया यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पोलीस भरतीसाठी आलेल्या चौघा उमेदवारांचे जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग आलीय. पुढच्या वर्षीपासून पोलीस भरती कार्यक्रमात बदल करण्यात येतील. उमेदवारांना यापुढं ५ किलोमीटरऐवजी ३ किलोमीटर धावावं लागेल आणि सकाळी ८ नंतर शारीरिक चाचण्या होणार नाहीत, अशा महत्त्वपूर्ण घोषणा आर. आर. पाटील यांनी आज केली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. दोघा जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी आचारसंहितेमुळं पोलीस भरतीला विलंब झाल्याचा खुलासा त्यांनी केला.