* कॉंग्रेसने आणला प्रकार चव्हाट्यावर
* मुख्यालय उपायुक्तांचा भ्रमणध्वनी ‘बिझी’
* सुरक्षा रक्षकांनीच हटविला उंदीर
नवी मुंबई :- संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यामध्ये दोन वेळा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळविणार्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा ‘बडा घर अन् पोकळ वासा’ या स्वरूपातील कारभार कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर यांनी चव्हाट्यावर आणला असून मुख्यालयाच्या प्रवेशद्वारालगतच्या कारंजात मृत उंदीर सडलेल्या अवस्थेत असल्याचे मेहेर यांनी प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. मृत उंदराची दुर्गधी पसरल्याने मुख्यालय उपायुक्त सिन्नरकर यांना मनोज मेहेर यांनी सतत संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी ‘बिझी’ असल्याचे पहावयास मिळाले.
महाराष्ट्रात नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या नवीन वास्तूची सातत्याने चर्चा होत असते. तथापि मुख्यालयाचे उद्घाटन करण्याच्या घाईत बांधकामामध्ये अनेक त्रृटी राहून गेल्या आहेत. सदोष स्लॅप, खारफुटीचा शेजार, पाण्याची गळती याबाबत पालिका मुख्यालयाच्या बांधकामाची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत.
कॉंग्रेसचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर हे नेरूळ सेक्टर सहामधील समस्यांबाबतची लेखी तक्रारपत्रे पालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, शहर अभियंता यांना देण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात गेले असता, त्यांना त्या ठिकाणी दुर्गंधीचा वास येवू लागला. त्यांनी प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाकडे विचारणा केली असता त्यासही काही माहिती नसल्याचे आढळून आले. कारंजात मृत उंदीर सडलेल्या अवस्थेत मनोज मेहेर यांच्या निदर्शनास आले. उंदराला किडे लागलेले असून त्याचीच दुर्गंधी पसरली होती. मनोज मेहेर यांनी तात्काळ प्रशासन उपायुक्त सिन्नरकरांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी खूप वेळ ‘बिझी’च होता.
पालिका मुख्यालयात स्वच्छता ठेवता येत नाही, दुर्गंधी येते, ते पालिका प्रशासन काय नवी मुंबईत स्वच्छता ठेवणार आणि नवी मुंबईकरांच्या आरोग्याची काय काळजी घेणार असा संताप मनोज मेहेर यांनी यावेळी व्यक्त केला. ही बाब मनोज मेहेर यांनी काही पत्रकारांच्याही निदर्शनास आणून दिली.
नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील समस्या सोडविण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने लेखी तक्रारपत्रे सादर करूनही कामे होत नाहीत. ज्यांना पालिका मुख्यालयात स्वच्छता ठेवता येत नाही, ते काय आमची कामे करणार, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया मनोज मेहेर यांनी यावेळी व्यक्त केली.