* स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप.
* रामाणेच्या प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरज पाटील यांची ढवळाढवळ
* कुकशेतचाही लवकरच शिरवणे-नेरूळ फेज १ होणार
योगेश शेटे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने केलेल्या आर्थिक मदतीच्या श्रेयावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राजकारण पेटले आहे. दि.३ फेब्रुवारी २०१४ या दिवशी रात्री.१० वाजता नेरूळ सेक्टर १६ येथील पंचरत्न सोसायटीमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधील गॅस गळतीमुळे झालेल्या स्पोटात अंगावर भिंत कोसळून तुकाराम दिघे आणि संगीता देवकर यांचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले होते. या सोसायटीत राहणारे नागरिक हे अल्प उत्पन्न गटातील असल्यामुळे ते छोटी-मोठी नोकरी करून आपला संसार चालवीत होते.त्यामुळे या गॅस सिलेंडर अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांनी केली.या अपघातानंतर नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने स्वतंत्र समिती तयार केली होती.यामध्ये स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांचाही समावेश होता.
सदर अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना मदत नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने दि. ७ फेब्रुवारी २०१४ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर केली होती. त्यानंतर सतत चार महिने स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांनी या अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना महानगर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत करावी यासाठी पालिका प्रशासन दरबारी पाठपुरावा केला होता. परंतु,सदर दुर्घटनाग्रस्तांना दि. ७ फेब्रुवारी २०१४ च्या भरलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या मदतीचा धनादेश महापौर सागर नाईक यांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांना विश्वासात न घेता तसेच त्यांना कोणता संदेश न देता परस्पर रामाणे यांच्या बाजूच्या प्रभागाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक सुरज पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकार्याना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन वाटप केले. गॅस सिलेंडर अपघातील मृताना प्रत्येकी दीड लाखांची आणि जखमींना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.
तसेच दुर्घटनाग्रस्तांना महानगर पालिकेची आर्थिक मदत महापौर किंवा आयुक्त महापौरांच्या किंवा आयुक्तांच्या दालनात करू शकत होते. महापौर सागर नाईक यांनी त्यांच्या घटनास्थळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यासोबत जाऊन स्थानिक नगरसेवकाला विश्वासात न घेता दुर्घटनाग्रस्तांना पक्षांतर्गत धनादेश वाटप करून मोठे राजकारण केले असल्याचे स्थानिक शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांच्या प्रभागात शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा २२०० मतांचे मताधिक्य मिळाल्यामुळे बाजूच्याच प्रभागाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरज पाटील हे स्वतः चा प्रभाग सोडून रामाणे यांच्या प्रभागात सतत कुरघोड्या आणि ढवळा ढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सतिश रामाणे यांनी केला आहे.