योगेश शेटे
* नवी मुंबईत भाजपाला बळकटी येणार
* मंदा म्हात्रे बेलापुरातील संभाव्य उमेदवार
मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार व शरद पवारांच्या निकटवर्तीय मंदा म्हात्रे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता भाजपात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे व विनोद तावडे यांच्या उपस्थितीत म्हात्रेंनी प्रवेश करताच भाजपने त्यांचे जोरदार स्वागत केले. गेल्या आठवड्यात त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
नवी मुंबईतील स्थानिक नेतृत्त्व व बंधू गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करीत म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मागील पंधरवड्यात म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात जेट्टीच्या उद्घाटन नामफलकावरून वाद झाला होता. तसेच तो पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. म्हात्रे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत असताना त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय गणेश नाईक घेण्याचा खाटाटोप करीत आहेत असे गंभीर आरोप केले होते. तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे पाठविला होता. म्हात्रे शिवसेनेत जाणार अशी चर्चा असतानाच आज त्यांनी अचानक भाजपात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंदा म्हात्रे या शरद पवारांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. पवारांची भगिनी म्हात्रे यांच्या जवळच्या मैत्रिण आहेत. त्यामुळे पक्षस्थापनेपासून मंदा म्हात्रे राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळेच पक्षाने त्यांना पक्ष स्थापन होताच महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद दिले होते. तसेच त्यांना विधान परिषदेतील आमदारकीही दिली होती. आता त्या विधानसभेसाठी तयारी करीत होत्या. मात्र, म्हात्रे यांचे बंधू गणेश नाईक हे ही त्याच विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांत पहिली वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे मागील काही दिवसापासून नाईक आणि म्हात्रेंमुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते.
नवी मुंबईतील जेट्टींच्या सुधारणेसाठी म्हात्रे यांनी विधान परिषदेचे आमदार असताना पाठपुरावा केला होता. त्यासाठी म्हात्रे यांनी जेट्टींसाठी मेरीटाईम बोर्डाकडून निधी उपलब्ध करून घेतला. तसेच या प्रकल्पाचे मागील महिन्यात म्हात्रे यांच्या हस्ते रीतसर उद्घाटन झाले. मात्र, जेट्टीच्या उद्घाटन फलकावर म्हात्रे यांचे नाव होते, तो फलक काढून टाकल्याचे गणेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले. म्हात्रे यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी थेट जेट्टी गाठले व तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गणेश नाईक तेथे दाखल झाले होते. त्यावेळी म्हात्रे यांनी फलक काढण्याबाबत थेट नाईक यांना उपस्थित अधिकारी व कार्यकर्त्यांदेखत जाब विचारत नाईकांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. तसेच याबाबत त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाईकांबाबत तक्रार केली होती. मात्र, राष्ट्रवादीसाठी नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असे सूत्र असल्याने पवारांनी म्हात्रे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. म्हात्रेंसाठी ते नाईकांना दुखावू शकत नव्हते. त्यामुळे म्हात्रे यांनी पक्षात होणारी घुसमट व नाईकशाहीमुळे भविष्यात न मिळणारी संधी पाहता मागील आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला होता. अखेर आज मंदा म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.