सुजित शिंदे ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गेली २० वर्षे मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. ५ वर्षे कॉंग्रेसमध्ये आणि त्यानंतरची १५ वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवारसाहेबांसोबत काम केले. पण नवी मुंबईत माझी कुचंबनाच होत राहीली. प्रदेश पातळीवरही पक्षासाठी संघटना बांधणी केली, पण माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी न्याय देवू शकले नाही. माझ्या कार्यकर्त्यांना मी पक्षाचे पालिकेत नगरसेवकचे तिकीट तर सोडाच, पण साधे वॉर्ड अध्यक्षपदही देवू शकले नाही. जनसेवा करण्यासाठीच आपण भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची कबुली मंदाताई म्हात्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंदाताई म्हात्रे यांनी सोमवारी सकाळी दादर येथील भाजपा कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांसह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाजपा प्रवेशाची पार्श्वभूमी आणि आगामी वाटचाल याबाबत माहिती देण्यासाठी बेलापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले, भाजपाचे नवी मुंबई अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, भाजपाचे भगवानराव ढाकणे, मारूती भोईर, सुनिल होनराव, रामचंद्र घरत, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यासह भाजपाचे नवी मुंबई पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी माझे कार्यक्षेत्र केवळ नवी मुंबईपुरतेच सिमीत न ठेवता महाराष्ट्रभर संघटना बांधणीचे कार्य केले आहे. मी भाजपात प्रवेश कोणतेही आश्वासन घेतले नाही. जी पक्षबांधणीची जबाबदारी देईल, ती मी सक्षमपणे पार पाडेन, इतकीच ग्वाही दिली असल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
२० वर्षात आपण जनसेवेला समर्पित करताना कधी एकाद्या पिकनिकला अथवा सिनेमालाही गेले नसल्याचे सांगून मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, केंद्रात भाजपाची सत्ता आली म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. उलटपक्षी १ वर्षापासून भाजपाची वरिष्ठ मंडळीच मी भाजपामध्ये प्रवेश करावा म्हणून माझ्या संपर्कात होती. भाजपाचे विनोद तावडे, नितीन गडकरी आदी नेतेमंडळींसोबत विधानभवनात काम करताना आपला परिचय होताच. माझ्या बेलापूर गावात नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय बांधण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच पदाधिकारी झाडून हजर होते. मी राष्ट्रवादीची प्रदेश पदाधिकारी असताना व माझ्याच गावात कार्यक्रम होत असताना कोणी माझे नावही घेतले नाही. असे अपमान मी पक्षात यापूर्वीही पचविले होते. पण मागे १५ दिवसापूर्वीही दिवाळेच्या जेटीवर एक घटना घडलेली सर्व नवी मुंबईकरांना माहिती आहेच. पाणी आता गळ्यापर्यत आले होते. त्यामुळेच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मंदा म्हात्रे या कडवट शरद पवार समर्थक असल्याने त्या अन्य कोठे जाणार नाहीत यावर ५ लाख रूपयांपर्यतच्या पैजा लागल्या होत्या. आज सकाळपर्यत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींचे आपणास पक्ष न सोडण्यासाठी फोन येत असल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
आपण कोणतेही आमिष वा महत्वाकांक्षा घेवून भाजपात प्रवेश केलेला नाही. नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रात मी काम करू शकते, मी सक्षम आहे, हे भाजपाच्याही नेतेमंडळींनी जवळून पाहिले आहे. विनोद तावडे यांनीच सकाळी भाजपा प्रवेशाच्या वेळी नवी मुंबईतील गणेश विसर्जन करण्यासाठी मंदाताईंचा भाजपा प्रवेश असल्याचे सांगितले. आपले लक्ष्य महापालिका हे असून त्यासाठी भाजपाची बळकट पक्षबांधणी करणार असल्याचे मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
रेल्वे दरवाढ हा निर्णय यूपीए सरकारच्याच काळात झाला होता. आता रेल्वे दरवाढीवर आंदोलन करणारे मागील १५ वर्षात काय करत होते, हे जनतेलाही माहिती आहे. रेल्वे दरवाढीवरच्या जनतेच्या भावना मोदींजींपर्यत नक्कीच पोहोचल्या असतील. रेल्वे अर्थसंकल्पात त्यांचा नक्कीच विचार केला जाईल असा आशावाद मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.