*आरक्षणाची खैरातः मराठ्यांना १६ तर मुस्लिमांना ५ टक्के
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
मुंबई : मराठा, मुस्लिम आरक्षणाला राज्यमंत्रीमंडळाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा १६ टक्के तर मुस्लिम ५ टक्के आरक्षण लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेतला.
कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण समिती नेमण्यात आली होती. राणे समितीने शिफारस केल्यानंतर नव्या आरक्षणाला मुंजरी देण्यात आली आहे. सध्याचे जे आरक्षण आहे. त्याला धक्का न लावता नव्याने आरक्षण लागू करण्यात आले आहे.
या नव्या आरक्षणानुसार मराठा आणि मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळणार आहे. मुस्लिम आरक्षणासाठी विशेष मागास मुस्लिम प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण ५२ टक्के आरक्षण आहे. नव्या आरक्षणामुळे राज्यात आता ७३ टक्के आरक्षण झाले आहे. आरक्षमाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. मात्र राज्य सरकारने मराठी समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडी सरकारने कंबर कसली आहे. राज्यात गेल्या १५ वर्षांपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना सपाटून मार खावा लागला होता. कॉंग्रेसला दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले होते. आगामी विधानसभेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आघाडी सरकारचा खटाटोप सुरु आहे.
राज्यात मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा विषय अनेक दिवस गाजत होता. परंतु नेमके किती टक्के आरक्षण द्यायचे यावर एकमत होत नव्हते. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत तर ज्येष्ठ आयएएस अधिकारी मेहमुदूर्र रहमान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम आरक्षणाबाबत एक समिती नेमण्यात आली होती. या समित्यांच्या शिफारसीवरून राज्यात मराठा आणि मुस्लिम समाजात ‘शैक्षणिक व सामाजिक मागास घटक’ या नव्या प्रवर्गाची निर्मिती करून या दोन्ही घटकांना आरक्षण देण्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले.