नवी मुंबई : जेल(कारागृह) कमिटीचा सदस्य आणि आमदार म्हणून अनेकदा जेलचा आढावा घेतला आहे. या जेलमधील स्थिती पाहता याठिकाणी बाल गुन्हेगारी हा उद्याचा गंभीर प्रश्न आहे. बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न होत आहेत. एखादी तरतूद करुन या प्रश्नाची मुळापासून समस्या सुटणार नसून बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ.संदीप नाईक यांनी केले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता आपल्यातील अंगीकृत कलेला प्रोत्साहित केले पाहिजे तरच आपण जगातील स्पर्धेत टिकून राहू , असेही आ.नाईक म्हणाले.
रबाळे आंबेडकरनगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात (नमुंमपा शाळा क्रमांक-५४, ५५)आज (ता.२६) राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने शालांत परीक्षेत सुयश मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान, नवी मुंबईतील शाळांमधील शिक्षकांचा गौरव, प्रभाग क्रमांक-१८ व १९ मधील महिला बचत गटांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ.नाईक बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.संदीप नाईक, नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे, रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र
देशमुख तसेच शिक्षण सहकार मित्र सुधाकर सोनावणे, नगरसेविका गौतमी सोनावणे, नगरसेविका रंजनाताई सोनावणे आदी मान्यवर, शिक्षक वर्ग व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
आ.संदीप नाईक यांनी नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि आपल्यातील क्रिएटीव्हिटी, शिस्तीविषयी साध्या भाषेत केलेल्या
मार्गदर्शनाचे आचरण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्या दूरदृष्टी विचारातून पालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविलेल्या स्कूल व्हिजन उपक्रमाच्या यशाचे उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज विद्यालय असल्याचे ते म्हणाले.कॅग सारख्या नामांकित संस्थेने याची दखल घेतली असून जागतिक स्तरावर पालिका शाळेची नोंद घेणारी नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव शाळा असल्याचे आ.नाईक म्हणाले.
आपण ज्याठिकाणी काम करतो त्या कामातून आपल्याला एक प्रकारे समाधान मिळत असते. चांगले किंवा वाईट कर्म करणे म्हणजे केवळ भ्रम आहे. प्रत्येकाने आपण करत असलेल्या कामावर अधिक प्रेम केल्यास त्या कामातील आपली गोडी वाढून आपोआपच चांगले आचरण निर्माण होते. आपण आपल्या कामावर प्रेम करायला शिकले पाहिजे, असा भविष्यातील मौलिक सल्ला नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिला.शिक्षण हे जरी सामाजिक क्रांतीचे स्त्रोत असले तरी संतांनी दिलेली शिकवण, महामानवांनी दिलेल्या विचारांचे आचरण केल्यास आपल्या देशातील अराजकता कमी होऊन एक चांगला देश घडेल, असा विश्वास मेंगडे यांनी व्यक्त केला.
शिक्षण सहकार मित्र सुधाकर सोनावणे यांनी शाळेच्या निर्मितीबरोबरच आत्तापर्यंतच्या जडर्णघडणीचा लेखाजोखा मांडला. गोरगरीब विद्यार्थ्यांना पालिकेमधून चांगले शिक्षण मिळावे, हाच आपला ध्यास असून शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देताना केवळ शालेय शिक्षण न देता त्यांच्यात सामाजिक बांधिलकीचे देखील धडे द्यायला हवेत, असे शिक्षकांना सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री ना.गणेश नाईक, डॉ.संजीव गणेश नाईक, आ.संदीप नाईक यांच्या संकल्पनेने स्कूल व्हिजनसारख्या उपक्रमाने शिक्षणाला गती मिळाल्याचेही सोनावणे म्हणाले.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षक नेहा गवळी, रंजना वनशा, विद्या भैसाणे, अलका ढवळे त्याचबरोबर शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाघमारे सरांनी केले.
विद्यार्थ्यांना मिळणार अवकाशाचा वेध घेणारी दुर्बिण
रबाळे परिसरातील गोरगरीब घरांमधील शालेय विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. या शाळेतील विद्यार्थ्यांना अंतराळातील नवीन शोधांची माहिती मिळावी. तसेच अवकाश संशोधनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी अवकाशाचा वेध घेणारी दुर्बिण लवकरच देण्याचे अभिवचन आ.संदीप नाईक यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व शिक्षकांना दिले.