नवी मुंबई : अपूर्णावस्थेतील नेरूळ येथील महापालिका रूग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री ना. गणेश नाईक यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी या रूग्णालयाचे उद्घाटन कशासाठी करता याबाबतचा जाब विचारला असता पोलिसांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष निशांत भगत व युवकच्या पदाधिकार्यांना अटक केली. कॉंग्रेसच्या या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाला उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने ऐरोली, बेलापूर, नेरूळ येथे नव्याने सामान्य रूग्णालये उभारण्यात आलेली आहेत. या रूग्णालयामध्ये तपासण्या व चाचण्या करणारी पुरेशी उपकरणे, यांत्रिक मशिन्स, रूग्णालयीन कर्मचारी यांचा भरणा नसल्याने या सर्व बाबींची पूर्तता करूनच रूग्णालयाचे उद्घाटन करावे असे ६ ऑगस्ट रोजी कॉंग्रेस जिल्हा कमिटीने पालिका आयुक्तांची भेट घेवून सांगितले होते. त्याचप्रमाणे पालिका आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या रूग्णालयाची सर्व बाबींची पूर्तता करूनच चार ते पाच महिन्याच्या कालावधीत होतील असे सांगून विरोधी पक्षाच्या सदस्यांना आश्वासित केले होते. तथापि सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रेय लाटण्यासाठी नेरूळ सेक्टर १५ येथे सोमवारी नव्याने उभारण्यात आलेल्या रूग्णालयातील बाह्य रूग्ण सेवा विभागाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रशासनावर दबाव टाकून आयोजित केला असल्याचा आरोप दशरथ भगत यांनी केला.
पालकमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी सिडको संचालक व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस नामदेवराव भगत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका अनिता शेट्टी, रंगनाथ औटी, अविनाश लाड, अरविंद नाईक, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे विठ्ठलराव यादव, निजाम अली शेख, रविंद्र सावंत, सचिन शिंदे, मनोज मेहेर व ऐरोली-बेलापूर मतदारसंघातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* कॉंगे्रसच्या आंदोलनावर पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती ही गैरसमजावर आधारित होती. नेरुळच्या सेक्टर १५ येथे नवी मुंबई महापालिकेने नव्याने बांधलेल्या संपूर्ण हॉस्पिटलचे उदघाटन नव्हते तर त्यामधील केवळ बाह्यरुग्ण सेवा विभागाचे म्हणजेच ओपीडीचे उदघाटन होते. हॉस्पिटलमध्ये सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर यथावकाश या रुग्णालयाचे उदघाटन होईल मात्र ओपीडी सुरु झाल्याने एका मध्यवर्ती ठिकाणी जनतेसाठी वैद्यकीय तपासणीसाठी एक चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. स्थानिक नगरसेवकांना ओपीडी उदघाटनाची आमंत्रणे गेली नाहीत, अशी तक्रार या नगरसेवकांनी माझ्यासमोर मांडली. त्याची आपण चौकशी करु असे आश्वासन या नगरसेवकांना दिले. सर्वांना दूरध्वनीवरुन आमंत्रण देण्यात आले होते, अशी माहिती पालिका प्रशासनाच्यावतीने मला देण्यात आली. कॉंगे्रसच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालणे गरजेचे होते.