दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील सभागृहनेते आणि ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी, वाशी येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक संपत शेवाळे यांनी तसेच दिघा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक नविन गवते यांनी सामाजिक जाणिवेतून त्यांचे दहीहंडी उत्सव पूर्णपणे रदद केले असून यामुळे वाचलेला निधी ते सामाजिक उपक्रमांवर खर्च करणार आहेत.
श्री. सुतार हे दरवर्षी ऐरोलीत अनंत प्रतिष्ठानची दहीहंडी भरवित असतात तर श्री गवते हे एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून दिघा येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत असतात. वाशी राष्ट्रवादी कॉंगे्रस प्रभाग क्रमांक ५६ सेक्टर १७मध्ये नगरसेवक शेवाळे हे दरवर्षी दहीहंडी उत्सव आयोजित करीत असतात. श्री.मढवी हे ऐरोली सेक्टर ५ येथे करण मित्र मंडळाच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव भरवित असतात. या चौघांनीही हे उत्सव रदद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनंत प्रतिष्ठानचे दहीहंडी फोडणारे महिला पथकही असून हे पथक दहीहंडी फोडण्यास जाणार नसल्याचे श्री. सुतार यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सवांमधून उंचच उंच थर रचण्याची वाढलेली जीवघेणी स्पर्धा, जखमी होणार्या गोविंदांची वाढलेली संख्या पहाता हा उत्सव रदद करण्याचा निर्णय घेतल्याचे या चार नगरसेवकांनी सांगितले. नवी मुंबईतील सानपाडा येथे दहीहंडीचा सराव करीत असताना जखमी झालेल्या किरण तळेकर या विद्यार्थ्यांचा अलिकडेच उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याला या तिघांनी श्रध्दांजली अर्पण करुन हा स्तुत्य निर्णय जाहीर केला आहे.