दिपक देशमुख
नवी मुंबई :- अध्यात्म नवी मुंबई या संस्थेच्या वतीने १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत श्री कृष्ण जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर १२ मधील गांवदेवी मंदीराजवळील देवाडिगा भवनमध्ये सांयकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत ह.भ.प सद्गुरू बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. भगवतीताई सातारकर, ह.भ.प चिन्मय महाराज सातारकर यांची किर्तने या श्रीकृष्ण जयंती सोहळ्यामध्ये होणार आहेत.
आध्यात्म नवी मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश जिजाभाऊ शिंदे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले असून कैलास पाटील हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. नवी मुंबईमध्ये आध्यात्माची परंपरा जोपासण्यात ज्यांचे सक्रिय योगदान आहे, त्यामध्ये रमेश शिंदे यांचा क्रमांक वरचा लागतो. वाशीत ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ढोकमहाराजांचे तुलसी रामायण यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन रमेश शिंदे यांच्या कल्पकतेमुळे शक्य झाले आहे.
रमेश शिंदे यांच्यामागे आध्यात्मामुळे दांडगा जनसंपर्क निर्माण झाला असून भाविकांशी, वारकर्यांशी त्यांचा परिचय निकटचा आहे. राजकारणातही शिंदे यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटवला असून नवी मुंबई महापालिकेत स्थापनेपासून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडूनही आले आहेत. राजकारणी नव्हे तर एक आध्यात्माचा वारकरी अशी रमेश शिंदेची नेरूळमध्ये प्रतिमा आहे. पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली भागातील आध्यात्मातील मंडळीशी असलेल्या घरोब्यामुळे रमेश शिंदेंची अजातशत्रूची प्रतिमा निर्माण झालेली आहे.
श्रीकृष्ण जयंती सोहळ्यानिमित्त नवी मुंबईकरांना सात दिवस ह.भ.प सद्गुरू बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. भगवतीताई सातारकर, ह.भ.प चिन्मय महाराज सातारकर यांच्या किर्तनाचा लाभ मिळणार असल्याने या सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रमेश शिंदे यांनी केले आहे.