दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसर आणि सारसोळे गाव हा परिसर भुरट्या चोरांसाठी माहेरघरच अलिकडच्या काळात बनू लागला आहे. चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांना त्याचा शोध घेता येत नसल्याने नेरूळ पोलिसांच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा वारंवार उघडकीस आल्या आहेत. अलिकडच्या काळात दुकाने फोडणे, घरफोडी, मोटर ट्रेनिंग स्कूलच्या वाहनांची नासधूस असेही प्रकार वाढीस लागले आहेत. नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील सिडकोच्या शिवम गृहनिर्माण सोसायटीमध्ये यशवंत गावडे यांच्या सदनिकेत झालेल्या घरफोडीचा गेल्या वर्षभरात नेरूळ पोलिसांना छडा न लावता आल्याने नेरूळ पोलिसांच्या तपासकार्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गतवर्षी ७ सप्टेंबर २०१३ मध्ये शिवम सोसायटीमध्ये बी/४, बी विंग, येथे दुसर्या मजल्यावर राहणारे सदनिकाधारक यशवंत गावडे यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दीड-पावणे दोन लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेला. सकाळी आठ ते रात्रौ आठ या बारा तासाच्या कालावधीत हा प्रकार घडला. ९६ सदनिकांची शिवम सोसायटीत वर्दळ ही नेहमीचीच. दुसर्या मजल्यावरील गावडे यांच्या सदनिकेचा कडीकोंयडा तोडणे, कपाटातील लॉॅकर तोडणे, दागिने व रोख रक्कम चोरीला जाणे हा सुमारे अर्ध्या-पाऊण तासाचा प्रकार घडत असतानाही शेजारील सदनिकांना हा प्रकार समजला नाही. तसेच या कालावधीत सोसायटीतील कोणीही दुसर्या मजल्यावर गेले नाही, हे एक गूढ वाढतच चालले आहे. गावडे यांच्या बंद घराविषयी माहिती असणार्यांनीच पाळत ठेवून हे कृत्य केले असल्याची आजही सोसायटी आवारात दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
७ सप्टेंबर २०१३ घरफोडीच्या घटनेला आता वर्षाचा कालावधी होत आला असून यशवंत गावडे यांनी चोरीच्या घटनेचा तपास कोठवर आला आहे याबाबत वारंवार नेरूळ पोलिस ठाण्यात चपलाही झिजविल्या आहेत. स्थानिक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुका चिटणिस मनोज मेहेर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना याबाबत लेखी निवेदन सादर करून गावडे यांच्या सदनिकेतील घरफोडीचा लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी केली होती. याच सोसायटीत बी/३, बी विंग येथे तळमजल्यावर राहणार्या गणपत सावर्डेकर यांच्या घरातील स्वंयपाकघरातील डब्यातून पाच तोळ्याच्या मंगळसूत्राची चोरी झाली होती. नेरूळ पोलिसांना याही गुन्ह्याची उकल करता आलेली नाही. सिडकोच्या शिवम सोसायटीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा आणि मंगळसूत्र चोरीचा तपास करताना नेरूळ पोलिसांच्या पदरी अपयश आलेले असून नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव या ठिकाणी झालेल्या अन्य चोर्यांचाही नेरूळ पोलिसांना आजतागायत शोध लागलेला नाही. मध्यंतरी नेरूळ सेक्टर सहामधील अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचीही नासधूस करण्यात आली होती. स्कूलच्या दरवाजा तोडण्याचा प्रयास करण्यात आला. वाहनांच्या काचांची तोडफोड करण्यात आली. नेरूळ पोलिसांना याही घटनेचा आजतागायत उलगडा झालेला नाही.
वर्षभरात आपल्या घरातील झालेल्या चोरीबाबतचा तपास जाणून घेण्यासाठी यशवंत गावडे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारून चपला झिजविल्या असता, त्यांना केवळ ‘तपास चालू आहे’ एवढेच उत्तर मिळते. या घरफोडीच्या गावडे यांच्या सदनिकेचा दरवाजाचा कडीकोंयडा तोडण्यात आला. कपाटातील लॉकर तोडण्यात आले. पोलीसांनी फिंगर प्रिंटवाले बोलावून ठशांची चाचपणीही केली. तथापि फिंगर प्रिंटमध्ये काहीही सापडले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरवाजाचा कडीकोंयडा तोडणे, कपाटातील लॉकर तोडणे घटना घडलेल्या असतानाही पोलिसांना फिंगर प्रिंटमध्ये काहीही न सापडणे यातच गौडबंगाल दडले असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे. नेरूळ पोलीसांच्या तपासाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.