दिपक देशमुख
नवी मुंबई : माळीण गावावर पडलेल्या नैसर्गिक आप्तीमुळे यंदाचा आपला दहीहंडी उत्सव रद्द करून नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनी १ लाख ५१ हजार रूपये माळीण गावासाठी मदतनिधी दिला आहे.
सिवूड्स परिसरात गेल्या काही वर्षापासून उपमहापौर अशोक गावडे यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. भरघोस बक्षिसे आणि दणदणीत सलामीची पारितोषिके यामुळे अशोक गावडेंचा दहीहडंी उत्सव नवी मुंबईतील गोंविदा पथकामध्ये नावारूपाला आला होता. माळीणची दुर्घटना नुकतीच घडलेली असून उपमहापौर अशोक गावडेदेखील त्याच आंबेगाव तालुक्याचे आहेत. गावडे यांनी माळीणच्या घटनेमुळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून या उत्सवावर वाचलेला दीड लाख रूपयांचा निधी माळीण गावच्या पुर्नवसनासाठी दिला आहे.
१६ व१७ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा या व्हॉट्स ग्रुपवरील सदस्यांनीदेखील माळीण गावची पाहणी करून तेथील ग्रामस्थांचा शोध घेवून त्यांना रोख स्वरूपात ९६६६६ रूपयांची मदत त्यांच्या हातात दिली आहे.