नवी मुंबई : ज्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा अशा महनीय व्यक्तींची स्मृतीभवने उभारण्याचे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून घडत असून माथाडी कामगारांचे आराध्य दैवत व श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देणारे महान नेते कै. आ.आण्णासाहेब पाटील यांचे स्मृतीभवन उभे राहत आहे याचा आनंद व्यक्त करीत ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी या वास्तूत आण्णासाहेबांवरील ग्रंथसंपदा, त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व चित्रीकरणाचा संग्रह अशा विविध गोष्टींनी परीपूर्ण संग्रहालय असावे असे सांगितले.
कोपरखैरणे से. ५ येथील भू.क्र.२४ वर जुनी समाजमंदीर इमारत तोडून त्याठिकाणी नवीन वास्तूच्या भूमिपुजन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. नवी मुंबईत ठिकठिकाणी महापुरुषांच्या प्रेरणादायी कार्याचे दर्शन घडविणारी स्मृतीभवने उभारली जात असून तशाप्रकारचा ठराव नुकताच महापालिका सर्वसाधारण सभेने सर्वसंमत केला. या चांगल्या निर्णयाबद्दल त्यांनी महापौरांसह सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी व्यासपिठावर स्थानिक नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे, नगरसेवक केशव म्हात्रे, सुरेश सालदर, रामआशिष यादव, प्रभाकर कांबळे, रविंद्र म्हात्रे, माजी नगरसेविका चंद्रभागा मोरे, कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे, विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कै.आ.आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृती जागविणारी ही इमारत १७ कोटी ३१ लाख १७ हजार ९२१ इतकी रक्कम खर्च करुन उभारण्यात येत असून यामध्ये तळघरात ३२ चारचाकी वाहने मावतील इतक्या क्षमतेचा वाहनतळ तसेच फर्निचर रुम व स्टोअर रुम असणार आहे. तळमजल्यावर ८ चारचाकी वाहने मावतील असे वाहनतळ आणि ५ रुम्स असणार आहेत. पहिल्या मजल्यावर २१७ क्षमतेचे सभागृह २ वेशभुषा कक्षासह असणार आहेत. दुसर्या मजल्यावर १२८ क्षमतेचे बाल्कनी सभागृह असणार असून याठिकाणीही २ वेशभुषा कक्ष असणार आहेत. तिसर्या मजल्यावर २१७ क्षमतेचे सभागृह व चौथ्या मजल्यावर ९८ क्षमतेचे सभागृह प्रत्येक मजल्यावर २ वेशभुषा कक्षासह असणार आहे. प्रत्येक मजल्यावर ए.एच.व्ही. कक्षाची व्यवस्था असून प्रसाधनगृह सुविधा असणार आहे. लिफ्ट सुविधेसह ४२११ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात उभ्या राहणार्या या इमारतीची आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर, बेसमेन्ट स्टिल्ट पार्किंग, वातानुकुलीत सभागृह, स्ट्रक्चरल ग्लेझींग, स्टोन क्लॅडी ही वैशिष्टे असणार आहेत. या स्मृतीभवनातून आण्णासाहेबांच्या अलौकिक कार्याची माहिती सर्वांनाच होईल व त्यापासून कायम प्रेरणा मिळत राहील असा विश्वास स्थानिक नगरसेवक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे यांनी प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केला.