दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळमध्ये वाढणार्या घरफोडीच्या घटना, दुकानांची लयलुट, चेन-स्नॅचिंग, जेटीवर जाळी जाळणे आदी गुन्ह्याची उकल करण्यात अपयश आलेल्या नेरूळ पोलीसांमुळे चोरांपुढे नेरूळ पोलीस हतबल झाल्याचे चित्र गेल्या काही महिन्यात स्पष्ट झाले आहे. गुरूवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान भुरट्या चोरांनी एक-दोन नव्हे तर तब्बल सहा वाहनांच्या काचा तोडत कारटेपची चोरी केल्याने नेरूळ पोलीसांना व त्यांच्या गस्तीला चोर जुमानत नसल्याचे उघडकीस आले आहे.
नेरूळ गावातील बांचोली मैदानात मनसेचे नेरूळ (प.)चे विभाग अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्या उभ्या असणार्या स्वीफ्ट गाडीची (क्रं.एमएच ४३/ व्ही १७९८) काच तोडून आतील कारटेप चोरून नेला व गाडीच्या आतल्या भागाचीही नासधूस केली. नेरूळ सेक्टर दोन परिसरात एका गाडीची काच तोडून तर दारावे गावात तीन वाहनांच्या काचा तोडून कारटेपची चोरी झाली आहे. नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गुन्हे घडत असून चोर, भुरटे चोर व अन्य गुन्हेगारांचा शोध लागत नसल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी नेरूळ पोलीसांच्या कार्यक्षमतेची उजळणी घेण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून केली जावू लागली आहे.