दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन परिसरात असलेल्या स्मशानभूमीवर सारसोळेच्या ग्रामस्थांनी हक्क सांगितला असून या स्मशानभूमीला सारसोळे गाव स्मशानभूमी नाव देण्याची गेल्या अडीच वर्षापासून सारसोळे ग्रामस्थांकडून प्रशासन दरबारी लेखी मागणी केली जात आहे. पालकमंत्र्यांपासून ते स्थानिक नगरसेविकेलाही ग्रामस्थांनी याबाबत निवेदन सादर केले असून स्मशानभूमीच्या नामकरणावरून लवकरच नेरूळ परिसरात वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नामकरणाच्या मागणीवरून नेरूळ सेक्टर दोन परिसरातील स्मशानभूमी पालिका प्रशासनदरबारी नावारूपाला आलेली आहे. स्मशानभूमीच्या विकासाचे व डागडूजीचे काम गेल्या काही महिन्यापासून संथगतीने सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ. स्नेहा पालकर गेल्या १५ वर्षापासून महासपालिकेत या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या स्मशानभूमीला सारसोळे गावचे नाव देण्याची मागणी करत सारसोळेचे युवा ग्रामस्थ आणि कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी गेल्या तीन वर्षापासून महापौर, उपमहापौर, आयुक्त तसेच पालकमंत्री ना. गणेश नाईक यांना सातत्याने लेखी निवेदनही सादर केलेले आहे. स्थानिक नगरसेविका सौ.स्नेहा पालकर यांनाही या नामकरणाबाबत लेखी निवेदन यापूर्वीच सादर केले असल्याचे मनोज मेहेर यांनी सांगितले.
नेरूळ सेक्टर दोनची स्मशानभूमी ही खर्या अर्थांने सारसोळे गावची आणि सारसोळेच्या ग्रामस्थांची स्मशानभूमी असल्याचे सारसोळेकरांचे म्हणणे आहे. प्रभागपुर्नरचनेत ही स्मशानभूमी बाजूच्या प्रभागात गेली आहे. स्मशानभूमीलाच नाही तर सारसोळे गावच्या क्रिडांगणालाही प्रभाग पुर्नरचनेचा फटका बसला असून श्रीगणेश रामलीला मैदानही सारसोळेकरांचेच असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. नवी मुंबईतील अन्य गावाच्या स्मशानभूमीवर नजर टाकली असता बाहेरील लोकांना अत्यंविधीसाठी अनेक अडथळे येतात, पण सारसोळेकरांनी या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याकरीता कोणतेही अडथळे आजतागायत आणले नाहीत. त्यामुळेच नेरूळ सेक्टर २,४, ६,८,१०,१२,१४,१४,१८,२०,२४,२८ येथील मृतदेहही सारसोळेच्याच स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जातात. ही स्मशानभूमी सारसोळे गावची असल्याने स्मशानभूमीच्या डागडूजीचे काम झाल्यावर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर ‘सारसोळे गाव स्मशानभूमी’ असा फलक लावण्याची मागणी मनोज मेहेर यांच्याकडून सातत्याने केली जात आहे.
महापालिका प्रशासनाने अथवा स्थानिक नगरसेविकेने सारसोळेकर ग्रामस्थांची नामकरणाची मागणी फेटाळून अन्य नाव दिल्यास मोठे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आतापासूनच निर्माण झाली आहेत.