नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभाग नवी मुंबईच्यावतीने नवी मुंबईतील मुस्लिमांच्या सद्य:स्थितीबाबत, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी वाशीत एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे.
मनसे जनहित कक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष हाजी शाहनवाझ खान यांनी या परिसंवादाच्या आयोजनात पुढाकार घेतला असून ५ सप्टेंबरला सांयकाळी ६ वाजता वाशी सेक्टर ११ मधील शालिमार बिल्डींग (दिव्य ज्योती हॉटेलजवळ) येथील ऑफिस क्रं. १६ येथे जनहित कक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
या परिसंवादात १) अल्पसंख्यांकासाठीचा आरक्षण मुद्दा २) मुस्लिम जागृत मतदार ३) नवी मुंबईत मुस्लिम भवन- मुशाफिर खाना ४) मस्जिद – कब्रस्थान ५) औकाफ या विषयावर चर्चा घडवून आणली जाणार असल्याची माहिती हाजी शाहनवाझ खान यांनी दिली.
नवी मुंबई शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यात राजकीय नेतृत्व उदयाला न आल्याने मुस्लिम समाजाच्या समस्या सुटल्या नाहीत.अन्य धर्मियाप्रमाणे मुस्लिम समाजालाही विकसित होण्याचा, प्रगती करण्याचा, समस्या सोडविण्याचा अधिकार असतानाही मुस्लिमांचा विषय निघाला की समाजविघातक शक्ति त्यास धार्मिक व राजकीय रंग देत असल्याने मुस्लिमांच्या समस्या सुटल्या नसल्याची खंत हाजी शाहनवाझ खान यांनी बोलून दाखविली.
मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी मुस्लिम समाज एकत्रित येणे गरजेचे आहे, त्याची सुरूवात होणे गरजेचे असल्याने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत या परिसंवादामध्ये नवी मुंबईतील मुस्लिमांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हाजी शाहनवाझ खान यांनी केले.