दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई हे सर्वसमभाव जपणारे शहर असून येथील नागरिकांमध्ये असलेला बंधुभाव वाढीस लागण्यामध्ये विविध आध्यात्मिक परंपरांचे योगदान आहे. नवी मुंबईला फार मोठा ऐतिहासिक वारसा नसला तरी येथील मूळ गांवात पुर्वीपासून जपल्या जाणार्या वारकरी परंपरेने नवी मुंबईचे वातावरण समाधानी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजाविली आहे. येथील गांवांतून जपल्या जाणा-या वारकरी परंपरेमध्ये नवी मुंबई विकसित होऊ लागल्यानंतर नवी मुंबईत रहायला आलेल्या नव्या रहिवाशांची मोलाची भर पडली आणि इथली आध्यात्मिक परंपरा अधिक उन्नत झाली अशा शब्दात भावना व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी या वारकरी भवनाच्या माध्यमातून दया, क्षमा, शांतीचा वावर असणारा अध्यात्माचा धागा घट्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगून ही भवन निर्मिती म्हणजे त्या परंपरेचा सन्मान असल्याचे मत मांडले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर, से.३ ए, भूखंड क्र.८ वर उभारण्यात येत असलेल्या वारकरी भवनाच्या भूमिपुजन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, ह.भ.प.तुकाराम महाराज रानकर, अ प्रभाग समितीच्या अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेविका सौ.शैला नाथ, आरोग्य समिती सभापती संदीप सुतार, नगरसेवक विनित पालकर, सुरज पाटील, सुरेश शेट्टी, सौ.नेत्रा शिर्के, सौ.स्वाती गुरखे साटम, साबू डॅनियल, शिक्षण मंडळ सदस्य श्रीम.राजश्री कातकरी, माजी नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, अशोक गुरखे, भरत जाधव कार्य.अभियंता सौ.शुभांगी दोडे, विभाग अधिकारी मनोहर गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
सी.बी.डी.बेलापूर, से.३ ए येथे भूखंड क्र.८ वर १६ कोटी ९६ लक्ष रक्कम खर्च करून ४०९५ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात बहुउद्देशीय स्वरूपात वारकरी भवनाची चार मजली भव्यतम वास्तू उभी राहत असून यामध्ये तळघरात २८ चार चाकी वाहनांची पार्कींग सुविधा तसेच तळमजल्यावर १० चारचाकी वाहनांची सुविधा आणि चार खोल्या असणार आहेत. पहिल्या मजल्यावर ३७९ व्यक्ती क्षमतेचे सभागृह बाजूला स्त्री व पुरूषांसाठी दोन स्वतंत्र कक्षांसह तसेच दुसर्या मजल्यावर १०२ व्यक्ती क्षमतेचे बाल्कनी सभागृह बाजूला स्त्री व पुरूषांसाठी दोन स्वतंत्र कक्षांसह त्याचप्रमाणे तिसर्या मजल्यावर १९२ व्यक्ती क्षमतेचे सभागृह बाजूला स्त्री व पुरूषांसाठी दोन स्वतंत्र कक्षांसह उपलब्ध होणार आहे. चौथ्या मजल्यावर सद्यस्थितीत त्या इमारतीत असलेल्या संस्था, ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध असणार आहे. या चार मजली इमारतीस लिफ्टची सुविधा ठेवण्यात आलेली असून प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्त्री पुरूष प्रसाधनगृह व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. या भव्यतम वारकरी भवन वास्तुचा उपयोग सर्वांनाच होईल व या पारमार्थिक धाग्यातून एक कुटुंबासारखे असलेले वातावरण नवी मुंबईत अधिक भक्कम होईल असा विश्वास मंत्रीमहोदयांनी व्यक्त केला.
वारकरी मंडळाचे नवी मुंबई अध्यक्ष या नात्याने भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर यांनी वारकरी भवन उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करून नवी मुंबईने याही बाबतीत आघाडी घेतली असल्याचा आनंद व्यक्त करीत शेकडो वर्षांचा गौरवशाली वारसा असणार्या वारकरी संप्रदायाचा सन्मान केल्याबद्दल समस्त आध्यात्मिक संप्रदायांच्या वतीने पालकमंत्री महोदयांच्या मनोभूमिकेचे स्वागत करून आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास वारकरी भाविकांसोबत नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.