* पालकमंत्री ना. गणेेश नाईक यांचा विश्वास
* सानपाडा येथे स्मृृतीभवनाचे भूूमिपूूजन संपन्न
दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई हे सर्वांना आपलेसे वाटणारे शहर असून याठिकाणी माणुसकी धर्माची जपणूक करीत प्रत्येक परंपरांचा सन्मान होतो. म्हणूनच समाजाने आदर्श घ्यावा अशा महनीय व्यक्तींच्या नावाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभी राहणारी भवने समाजाला दिशा देणारी ठरतील, अशा शब्दात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भावना मांडत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे उभे राहणारे स्मृतीभवन समाजाला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर १०, सानपाडा येथे भूखंड क्र.१८७ वर उभ्या रहात असलेल्या नियोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवन भूमिपूजन समारंभ मंगळवारी (ता.२) पार पडला. याप्रसंगी ना. नाईक बोलत होते. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी या भवनासाठी पाठपुरावा करुन महापालिकेकडून भूखंड उपलब्ध करुन दिला आहे.
भूमिपूजन समारंभप्रसंगी ना. नाईक यांच्यासमवेत व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनवणे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब गोपले, स्थानिक नगरसेवक काशिनाथ पाटील, नगरसेवक प्रभाकर कांबळे, केशव म्हात्रे, अर्जुन आडागळे, शिक्षण मंडळ सदस्य अर्जुन सिंघवी व राजश्री कातकरी, कार्यकारी अभियंता शंकर पवार, परिवहन समितीचे माजी सभापती उमाकांत नामवाड, माजी नगरसेवक अशोक पाटील, नंदू चव्हाण, दिलीप बोर्हाडे, काशिबाई लांडगे, मीना पाचारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईत उभे राहणारे अण्णाभाऊ साठे यांचे भवन हे त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारे ठरण्याच्या दृष्टीने त्यांच्या साहित्यसंपदेने परीपूर्ण ग्रंथालय या ठिकाणी असावे. त्याचबरोबरीने त्यांच्या मूळ छायाचित्रांच्या प्रतिकृती येथे असाव्यात. त्यांच्या भाषणाच्या तसेच त्यांच्या साहित्यकृतीवरील नाटके, चित्रपटांच्या ध्वनी-चित्रफिती याठिकाणी जतन केल्या जाव्यात अशी भूमिका ना. नाईक यांनी मांडली. अण्णाभाऊंच्या प्रेरक वाक्यांचे फलक याठिकाणी प्रदर्शित केले जावेत जेणेकरून या ठिकाणी भेट देणारे विचारांनी समृद्ध होतील अशीही सूचना ना. नाईक यांनी केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जागत्या ठेवणार्या या नियोजित भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी समाज उध्दाराचे महान कार्य केले. त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासमोर रहावे, याकरीता त्यांच्या स्मारकासाठी भूखंड मिळावा, अशी मागणी आ. संदीप नाईक यांनी विधानसभेत केली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेकडे भूखंडाची मागणी केली होती. महापालिका अधिकार्यांसमवेत बैठका घेतल्या होत्या. आ. संदीप नाईक यांच्या पाठपुराव्याने सानपाडा येथे महापालिकेने भूखंड उपलब्ध करुन दिला त्या भुखंडावर अण्णाभाऊ साठे स्मृती भवनाचे भूमिपूजन करण्यात आले.
अण्णाभाऊंचे स्मारक उभारण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे नवी मुंबई हे केवळ प्रकल्प आणि नागरी कामांमध्ये आधुनिकता जपत नाही तर समाजासमोर आदर्श ठेवावा अशा परंपरांचा, महामानवांचाही यथोचित आदर करण्यात आघाडीवर असणारे शहर आहे. हे भव्य स्मृतीभवन उभारण्यातून अण्णाभाऊंच्या कार्याचा अशाप्रकारे गौरव केल्याबद्दल पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचेसह सर्वच सहभागी घटकांचे आभार.
– बाबासाहेब गोपले
वैशिष्टये
* जुईनगर रेल्वे स्टेशनपासून केवळ पाचच मिनिटांच्या अंतरावर
* २२४८५ चौरस फूट क्षेत्रफळावर बांधकाम
* पहिल्या टप्प्यात पार्कींगसाठी तळघर, तळमजला, दोन मजली इमारत
* दुसर्या टप्प्यात आणखी दोन मजले बांधण्याचे प्रस्तावित