दिपक देशमुख
नवी मुंबई : अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीचेच सरकार येणार असल्याची सर्वत्र जोरदार हवा सुरू झाली आहे. गतवेळी मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. नवी मुंबईतील दोनपैकी बेलापुरमध्ये मनसेने निवडणूक लढविली, मात्र ऐरोलीमध्ये मनसेने उमेदवार उभा केला नाही. मनसेचे बेलापुरमधील राजेंद्र महाले या उमेदवाराने १९५०० पेक्षा अधिक मतदान घेतल्याने भाजपाच्या सुरेश हावरेंना कडवट झुंज देवूनही पराभूत व्हावे लागले. आता राजकीय परिस्थितीत बदल झाला असून मनसेच्या रेल्वे इंजिनामध्ये नवी मुंबईत फारसा दम राहीला नसल्याचे लोकसभा निवडणूकीत पहावयास मिळाले आहे. मनसेचा घटता जनाधार नवी मुंबईत कोणाला तारणार आणि कोणाला मारणार याबाबत आतापासून तर्कवितर्कांना उधान आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऐरोली आणि बेलापुर या विधानसभेच्या दोन जागा लढविण्याकरीता अनेक जण इच्छूक आहेत. पक्षाने ठाणे येथे घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये बेलापुरच्या जागेकरीता खुद्द शहरअध्यक्ष गजानन काळे, मागच्या वेळचे उमेदवार राजेंद्र महाले, मनसे जनहित नवी मुंबईचे अध्यक्ष हाजी शाहनवाझ खान, मनसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार, मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष शिरीष पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी आरती धुमाळ यांनी इच्छा व्यक्त केली आहे. ऐरोलीच्या जागेकरीता मनसेचे शहर उपाध्यक्ष गजानन खबाले, निलेश बाणखिले आणि शहर चिटणिस संदीप गलुगडे यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
गतवेळी विधानसभा निवडणूकीत बेलापुरमधून मनसेला २० हजाराच्या आसपास मतदान मिळाले असले तरी त्यानंतर पाठोपाठ झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत मनसेचे खर्या अर्थांने पानिपत झाले. ६० उमेदवार उभे केले, एकाही उमेदवाराचे नगरसेवकामध्ये रूपांतर झाले नाही. मनसेमध्ये मधल्या काळात इनकमिंगऐवजी आऊटगोईंगचेच प्रमाण वाढत राहील्याने सुरूवातीच्या काळात वटवृक्षाप्रमाणे बहरलेला मनसे पानझड झालेल्या वृक्षाप्रमाणे आता निस्तेज दिसू लागला आहे. गटबाजीच्या ग्रहणातून आणि मतभेदाच्या सावलीतून आजही नवी मुंबई मनसे बाहेर पडलेला नाही. ढासळता जनाधार, पदाधिकार्यांमधील सुंदोपसुंदी, कार्यकर्त्यांचा अभाव यामुळे ‘झाकली मुठ सव्वा लाखाची’ ठेवायची असेल तर मनसेने नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा लढवूच नये असा सूर मनसेच्या ठराविक पदाधिकार्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आळविला जावू लागला आहे.
विधानसभा निवडणूकीत कमी मतदानाचा टक्का कायम राहील्यास त्यापाठोपाठ येवू घातलेल्या पालिका निवडणूकीत सहभागी होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांचे अगोदरच मानसिक खच्चीकरण होण्याची भीतीही मनसेच्या छावणीत व्यक्त केली जावू लागली आहे. मनसेचा घटता जनाधार लक्षात घेता ऐरोली आणि बेलापुरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीत सरळ लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सरळ लढत ही कोणाला फायदेशीर तर कोणाला त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने मनसेचा जनाधार हा ऐरोली आणि बेलापूरमध्ये निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मनसेच्या उमेदवारीकरीता अद्यापि मुलाखती सुरू झाल्या नसल्या तरी ऐरोलीतून गजानन खबाले आणि बेलापुरमधून शहरअध्यक्ष गजानन काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून ऐरोलीपेक्षा बेलापुरात मनसेला अधिक मतदान होण्याची दाट शक्यता आहे.