नवी मंुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका १५ ऑक्टोबर रोजी होणार असून १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात ऐरोली आणि बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होेत असून आघाडी आणि महायुतीबाबत जागावाटपावरून अद्यापि तळ्यात-मळ्यात असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मात्र निश्चित मानले जात आहेत. अन्य पक्षाचे उमेदवार व जागा कोणाकडे गेली हे निश्चित झाल्यावरच राजकीय रणधुमाळीला रंग चढण्याची शक्यता आहे. जेमतेम महिनाभराने मतदान होणार असल्याने उमेदवार निश्चितीवरून अन्य पक्षांमध्ये कलगीतुरा असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र उमेदवार निश्चितीमुळे जनसंपर्क व अन्य राजकीय समीकरणांमध्ये तुर्तास आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे.
ऐरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप नाईक आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निश्चित मानली जात आहे. ऐरोली मतदारसंघात भाजपाची ताकद नगण्य असल्याने महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेत ऐरोलीच्या जागेसाठी भाजपा दावाही करणार नाही अथवा आग्रहही धरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेच्या छावणीतून शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि युवा सेनेचे नवी मुंबई प्रमुख वैभव नाईक यांच्याच नावाची प्रामुख्याने चर्चा होत आहे. राज्यात व केंद्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची आघाडी असली तरी नवी मुंबई कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिलेदारांचे आणि कॉंग्रेसी सुभेदारांचे विळ्या-भोपळ्याचे नाते असून दोघांमधून सध्या विस्तवही जात नाही. कॉंग्र्रेसकडून ऐरोली मतदारसंघातून कॉंग्रेसचे स्थानिक नेते व नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे बंडखोरी करून कॉंग्रेसी ताकद दाखविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. ‘आम आदमी पक्षा’ची नवी मुंबईत मधल्या काळात थोड्या फार प्रमाणात हवा निर्माण झाली होती.पण ती हवा आता विरल्याचे आणि चचार्र्ही थंडावल्याचे पहावयास मिळत आहे. ‘आप’कडून ऐरोली मतदारसंघातून के.आर. गोपी नशिब आजमावण्याची शक्यता ‘आप’शी संबंधित घटकांकडून व्यक्त केली जात आहे. आप आणि मनसेला फारसा जनाधार राहीलेला नसल्याने ऐरोली मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच ‘एकास एक’ लढत होण्याची दाट शक्यता आहे. कॉंग्र्रेसी बंडखोर उभा राहीला तर ऐरोलीची लढत रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक हे पुन्हा एकवार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात जागा अदलाबदलीसाठ शिवसेना-भाजपामध्ये जे चर्चेचे गुर्हाळ सुरू आहे. त्यामध्ये प्राधान्याने बेलापुरच्याही जागेचा समावेश आहे. गतनिवडणूकीत ही जागा भाजपाने लढविली होती. पण आता या जागेसाठी शिवसेनेकडून आग्रह धरला जात आहे. भाजपाच्या तुलनेत अधिक नगरसेवक, भक्कम पक्षबांधणी या निकषावर बेलापुरची जागा लढविण्यास शिवसेना उत्सुक आहे. भाजपाचे स्थानिक नेते सुरेश हावरे यांनी नवी मुंबईच्या राजकारणातून स्वारस्य काढून घेतल्यावर भाजपाकडे बेलापुर विधानसभा लढविण्याइतका प्रबळ उमेदवारच नव्हता. त्यामुळे शिवसेनाच बेलापुर लढणार असल्याचे कालपरवा स्पष्टही झाले होते. तथापि सौ. मंदाताई म्हात्रेंच्या भाजपा प्रवेशामुळे सर्व समीकरणे बदलत गेली. भाजपाकडे विधानसभा लढण्यासाठी प्रबळ व मातब्बर उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रेंच्या रूपाने अनायसे उपलब्ध झाला. शिवसेना ही जागा लढविण्यासाठी कमालीची उत्सुक असून विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेत एकाहून एक असे स्थानिक भागातील मातब्बर इच्छूक आहेत. बेलापुरच्या जागेसाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, खारफुटीप्रेम सुकुमार किल्लेदार आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे.
जागावाटपात भाजपाला जागा मिळाल्यास भाजपाकडून सौ. मंदाताई म्हात्रेंचे नाव निश्चित असले तरी ज्येष्ठ नेते मारूती भोईर, वर्षा भोसलेे यांच्यासह अन्य काही नावांची चर्चा सुरू आहे. लढाईची घोषणा झाली आहे. कुरूक्षेत्रावर योध्दे तयार आहे. राष्ट्रवादीकडून ऐरोली व बेलापुरचे सरदार निश्चित झाले आहेत. शिवसेना-भाजपाकडून बेलापुर जागेसाठी गोंधळ अद्यापि निस्तारला नसतानाच ऐरोलीत जिल्हाध्यक्ष विजय चौगुले आणि युवा सेनाध्यक्ष वैभव नाईक यांच्यात चुरस असल्याचे बोललेे जात आहे. राजकीय रणसंग्रामाकरीता अवघ्या ३० दिवसाचा कालावधी शिल्लक राहीला आहे. लोकसभा निवडणूक निकालामुळे शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकार्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे पहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर १५ ऑक्टोबर होत असलेेली विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठी आणि प्रतिष्ठेसाठी महत्वाची बनली आहे. सोशल मिडीयामध्ये शिवसेना-मनसेच्या आक्रमकतेपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव पाहिजे त्या प्रमाणात पहावयास मिळत नाही.