* नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांसाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार! * ना.गणेश नाईक व आ. संदीप नाईक गुरूवारी अर्ज भरणार! * भाजपाच्या सौ. मंदाताई म्हात्रेदेखील गुरूवारीच अर्ज भरणार?
अनुराग वैद्य
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या १५ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमुळे राज्याच्या कानाकोपर्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात असलेल्या ऐरोली आणि बेलापुर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अद्यापि निश्चित झाले नसले तरी आघाडीकडून मात्र विद्यमान आमदारांवर , नामदारांवरच शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे. आघाडी आणि महायुती अशी एकास एक सरळ लढत होणार असली तरी प्रकल्पग्रस्त आघाडी किती मते घेणार आणि प्रकल्पग्रस्त आघाडीचा कोणाला लाभ तर कोणाला फटका याचे उत्तर मात्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
आघाडीतर्फे ऐरोली व बेलापुर या दोन्ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच वाट्याला येणार असून ऐरोलीतून विद्यमान आमदार संदीप नाईक तर बेलापुरातून ना. गणेश नाईक हेच पुन्हा निवडणूका लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेलापुरच्या जागेसाठी शिवसेनेने कितीही जोर लावला तरी ही जागा भाजपाचाच लढविणार असल्याचे संकेत अखेरच्या टप्प्यात स्पष्ट होवू लागले आहेत. भाजपाकडून सौ.मंदाताई म्हात्रेच उमेदवार राहणार असून आघाडीतर्फे ना. गणेश नाईक आणि महायुतीतर्फे सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यातच अटीतटीची लढत होणार आहे. मनसेच्यावतीने बेलापुरमधून मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळेच निवडणूक लढविणार असून प्रकल्पग्रस्त आघाडीकडून डॉ. राजेश पाटील निवडणूक रिंगणात सहभागी होणार आहेत.
ऐरोली मतदारसंघात आघाडीतर्फे विद्यमान आमदार संदीप नाईकच निवडणूक रिंगणात सहभागी होत असून मनसेच्या वतीने ऐरोलीसाठी शहर उपाध्यक्ष गजाजन खबालेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे. प्रकल्पग्रस्त आघाडीतर्फे ऐरोलीतील नाव गुलदस्त्यात असून शिवसेनेकडूनही अद्यापि नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेनेकडून कधी जिल्हाप्रमुख विजय चौगुले तर कधी युवा सेना जिल्हाप्रमुख बैभव नाईक यांचे पारडे वरखाली होत असल्याचे शिवसैनिकांच्या चर्चेदरम्यान पहावयास मिळत आहे.
गुरूवारी ना.गणेश नाईक हे बेलापुरला आपला उमेदवारी अर्ज तर संदीप नाईक ऐरोलीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपाच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. मंदाताई म्हात्रे यादेखील गुरूवारीच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यावर खर्या अर्थांने नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आचारसंहिता लागण्याअगोदरपासून गणेशोत्सवापूर्वीपासून इच्छूकांनी आपला प्रचार जोरात सुरू केल्याचे पहावयास मिळत होते.