अनुराग वैद्य
नवी मुंबई : महायुतीबाबत ठोस निर्णय जाहीर होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहीला असतानाच नवी मुंबईतील बेलापुर मतदारसंघात भाजपा नेत्या सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या जनसंपर्क मोहीमेने राजकीय समीकरणे बदलण्यास प्रारंभ झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात रणरागिणी, आक्रमक महिला नेतृत्व म्हणून ज्या मोजक्या महिलांना ओळखले जाते, त्यामध्ये सौ. मंदाताई म्हात्रेंच्याही नावाचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांमध्ये एकेकाळी सौ. मंदाताई म्हात्रेंची गणना व्हायची, त्याच सौ. मंदाताई म्हात्रेंनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपाच्या कमळाला पसंती दिली. सौ. मंदाताई म्हात्रेंच्या आगमनाने बेलापुर मतदारसंघात मरगळ आलेल्या भाजपाने कात टाकल्याप्रमाणे कामास सुरूवात केली आहे.
बेलापुर मतदारसंघाबाबत शिवसेनेने गेल्या काही महिन्यापासून मोर्चेबांधणी केली असली तरी हा मतदारसंघ भाजपालाच मिळणार आणि आपणासच उमेदवारी लढवावी लागणार हे सौ. मंदाताई म्हात्रेंनी पूर्वीच जाणल्याने त्यांनी गेल्या तीन-साडेतीन महिन्यापासूनच जनसंपर्क अभियान आणि अभियानातून मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केलेली आहे. अद्यापि महायुतीचे तसेच आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी सौ. मंदाताई म्हात्रेंनी गेल्या काही दिवसांमध्ये बेलापुर मतदारसंघ ढवळून काढला आहे.
गावागावात जावून ग्रामस्थांच्या बैठका घेणे, ठिकठिकाणच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून रहीवाशांना त्यांची भूमिका समजावून सांगणे आणि जाती-धर्माच्या मान्यवरांना आपलेसे करून घेणे हा एककलमी कार्यक्रम सौ. मंदाताई म्हात्रेंकडून राबविला जात असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी मतदारसंघात जनसंपर्काची पहिली फेरी आटोपली असल्याचे बोलले जात आहे.
एका नगरसेविकेपासून महिला प्रदेश अध्यक्षापर्यत महिलेने मजल मारण्याचा अभिमान ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे मोदी लाट अद्यापि काही प्रमाणात कायम असल्याने परप्रातिंयदेखील सौ. मंदाताई म्हात्रेंच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाल्याचे भाजपा कार्यकर्त्यांकडून व पदाधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. सौ.मंदाताई म्हात्रेंचा जनसंपर्क अभियानाचा वाढता आवाका आणि दुसरीकडे आघाडी आणि मनसेची शांतता पाहता तुर्तास बेलापुर मतदारसंघात सौ. मंदाताई म्हात्रेंचे वादळ घोंघावत असल्याचे पहिल्या टप्प्यात पहावयास मिळत आहे.