अनुराग वैद्य
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या १५ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये राज्यातील काही मतदारसंघातील लढतीकडे राजकीय धुरींणाचे लक्ष लागून राहीले आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बेलापुर मतदारसंघाचा एक समावेश आहे. भाजपा नेत्या सौ. मंदाताई म्हात्रे या बेलापुर विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी (दि. २६) आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
बेलापुर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ना. गणेश नाईक , भाजपाकडून सौ. मंदाताई म्हात्रे, मनसेकडून शहरअध्यक्ष गजानन काळे आणि प्रकल्पग्रस्त आघाडीकडून डॉ. राजेश पाटील निवडणूक रिंगणात सहभागी होत असल्याने चौरंगी लढत अटळ आहे. कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष दशरथ भगत हे अपक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा असली तरी दशरथ भगत हे निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. चौरंगी लढतीत अपक्ष म्हणून आणखी एकादा मातब्बर सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम सभागृहातील नगरसेविका ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा, विधान परिषद सदस्या असा त्यांचा प्रवास राहीला आहे. आक्रमक वृत्तीच्या, रोखठोक स्वभावाच्या सौ.मंदाताई म्हात्रेंचा वकूब ठाणे जिल्ह्याला परिचित आहे. स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारणाला कंटाळून सौ. मंदाताई म्हात्रेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.
सौ.मंदाताई म्हात्रेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रदेश स्तरावर काम केले असले तरी नवी मुंबईशी त्यांचा सातत्याने कानाकोपर्यात संपर्क राहीलेला आहे. बेलापुर मतदारसंघ वाशी गांव ते बेलापुरदरम्यानच असल्याने ना. गणेश नाईक आणि सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कॉंग्रेसी घटकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेला स्थानिक पातळीवरील वाद पाहता कॉंग्रेसीचे पडद्याआडून भाजपाच्या सौ. मंदाताई म्हात्रेंनाच सहकार्य मिळण्याचा आशावाद भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळे आणि प्रकल्पग्रस्त आघाडीचे डॉ. राजेश पाटील हे किती मते मिळवितात यावर ना. नाईक आणि सौ.मंदाताई म्हात्रेंचा जय-पराजय अवलंबून राहण्याची अधिक शक्यता आहे.