अनुराग वैद्य
नवी मुंबई : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०१४ रोजी होत असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे राज्याच्या कानाकोपर्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघातून ना.गणेश नाईक आणि १५०-ऐरोली विधानसभा मतदार संघातून आमदार संदीप नाईक आपापले उमेदवारीअर्ज गुरुवारी दाखल करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
बेलापूर विधानसभा मतदार संघातून ना.गणेश नाईक दुपारी २ वाजता सीबीडी-बेलापूर येथील कोकणभवन निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकात दुपारी १ वाजता नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र जमून अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने नामदार नाईक यांच्यासमवेत जाणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर नामदार नाईक हे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत.
ऐरोली विधानसभा मतदार संघातून संदीप नाईक हे दुसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुपारी १२.४५ वाजता ऐरोली येथील निवडणूक कार्यालयात ते कार्यकर्त्यांसमवेत मिरवणुकीने जावून आपला उमेदवारीअर्ज दाखल करणार आहे. सकाळी ११ वाजता ऐरोली सेक्टर ४ येथील अग्निशमन केंद्राजवळ कार्यकर्ते जमणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर आमदार संदीप नाईक हे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.