नवी मुंबई /प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबई शहर जलसंपन्न शहर म्हणून ओळखले जाते. इतर शहरात नागरिकांना पाणीकपातीला समोरे जावे लागत असताना नवी मुंबईकर नागरिक मात्र पाण्याच्या दृष्टीने सूखी व समाधानी आहेत. यंदा पावसाला काहीशी उशीरा सुरूवात होऊनही नंतरच्या काळात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोरबे धरणातील पाणीसाठा आता पूर्णत: भरण्याच्या उंबरठ्यावर असून गुरूवारी महापौर सागर नाईक यांनी उपमहापौर अशोक गावडे यांचेसह मोरबे धरण प्रकल्पास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
मोरबे धरणाची पाणी साठवणूक उच्चतम पातळी ८८ मी. इतकी असून त्यामध्ये आज ८७.२५ मी. इतका पाणीसाठा आहे त्यामुळे पुढील सप्टेंबर २०१५ पर्यंत नवी मुंबईकरांना पाण्याची अजिबात चिंता नाही असे सांगत महापौर श्री.सागर नाईक यांनी नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात मोरबे धरण पूर्ण भरण्याची श्रीगणेशाला प्रार्थना केली आहे तो दिवस लगेचच येईल असा विश्वास व्यक्त केला. पिण्याच्या पाण्याची बचत व्हावी यादृष्टीने पिण्याव्यतिरिक्त विविध गोष्टींकरीता नागरिकांकडून वापरले जाणारे पाणी याकरीता महानगरपालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातून मिळणार्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात असल्याचीही माहिती महापौरांनी दिली तसेच नियोजित सौरऊर्जा प्रकल्पाच्या जागेचीही अधिकार्यांसमवेत पाहणी केली.
माथेरान नजिकच्या निसर्गरम्य परिसरात पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवरील निसर्गत:च स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा जलस्त्रोत असणारा मोरबे धरण प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेची मौल्यवान जलसंपत्ती आहे. प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचे स्वत:च्या मालकीचे धरण असणारी स्वातंत्र्योत्तर कालावधीतील नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून किमान दरात कमाल पाणी देणारी महानगरपालिका म्हणून नवी मुंबई ओळखली जाते. इतर कोणत्याही शहरांच्या तुलनेत जलसंपन्न असलेल्या पाण्याच्या दृष्टीने सूखी व समाधानी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्याला जलसमृद्धता लाभली असली तरी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापौर सागर नाईक यांनी केले आहे.