सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांची घोषणा कोणत्याही क्षणी होवून आचारसंहिता सुरू होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची उमेदवारी निश्चित असली बेलापुरची जागा भाजपा लढविणार की शिवसेना याबाबत अद्यापि तळ्यात-मळ्यातच आहे. भाजपाकडून सौ. मंदाताई म्हात्रे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात असून शिवसेनेकडून मात्र चार-पाच जण निवडणूक लढविण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र यापेक्षा मतदारांमध्ये अन् राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांमध्ये शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते डॉ. राजेश पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस -सिडको संचालक नामदेव भगत यांच्याच संभाव्य उमेदवारीविषयी अधिक चर्चा होत आहे.
आघाडी आणि महायुती व्यतिरिक्त मनसे स्वबळावर लढण्याचे संकेत एव्हाना स्पष्ट झाले असून आघाडीतून बेलापुरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यात पूर्वीप्रमाणे गेली असली तरी शिवसेना-भाजपामध्ये मात्र बेलापुरच्या जागेसाठी घमासान सुरूच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील स्थानिक पातळीवरील घटकांचे अगदी विळ्या-भोपळ्याचे नाते असल्याने कॉंग्र्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीचा कितपत धर्म बजावतील याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. कॉंग्र्रेसी घटक विधानसभा निवडणूकीत आपले काम गांभीर्याने करणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही गृहीत धरले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विजयात ‘खो’ घालण्याचेच काम कॉंग्रेसी घटकांकडून अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीतही कॉंग्रेसी घटकांनी आघाडी धर्म पाळताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजीव नाईकांचे काम कितपत गंभीरपणे केले होते, हे नवी मुंबईकरांनीदेखील उघडपणे पाहिले होते.
गतविधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला बेलापुरची जागा न मिळाल्याने कॉंग्रेसच्या नामदेव भगत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात नशिब आजमावणार्या नामदेव भगताच्या शिट्टीला जवळपास १३ हजाराच्या आसपास मतदारांनी पसंती दिली होती. कॉंग्रेसच्या निशाणीवर मैत्रीपूर्ण लढत झाली असती तर कदाचित मागच्याच निवडणूकीत निकाल वेगळा लागला असता. नामदेव भगत हे प्रारंभापासून कट्टर कॉंग्रेसचे कार्यकर्ते. तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते आज कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणिसपदापर्यत पोहोचले आहेत. नवी मुंबईत कॉंग्रेस पक्षाने सातत्याने चढउतार पाहिले आहेत. नामदेव भगतांनी सातत्याने कॉंग्रेसशी निष्ठा ठेवली. त्याचे फळ त्यांना मिळाले. भगत घराण्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही नामदेव भगत यांनी सिडको संचालकपदापर्यत गरूड भरारी मारलेली आहे. सध्या स्थानिक पातळीवरील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शीतयुध्द पाहता नामदेव भगत पुन्हा बंडखोरी करणार का, याबाबत नवी मुंबईकरांसह राजकीय क्षेत्रातही उलटसूलट चर्चा सुरू आहे. नामदेव भगत हे कॉंग्रेसला लवकरच सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वावड्याही मधल्या काळात उठल्या होत्या. पण त्या केवळ राजकीय अफवाच असल्याचे अल्पावधीत स्पष्ट झाले होते. नामदेव भगत निवडणूक रिंगणात उतरून पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला तापदायक ठरणार अथवा आघाडीचा धर्म निभावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पर्यायाने ना. गणेश नाईकांचा प्रचार करणार याच्या उत्तरासाठी आपणास अजून १५ दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
डॉ. राजेश पाटील हे बेलापुर पट्टीतील संयमी आणि उच्च विद्याविभूषित नेतृत्व म्हणून बेलापुर पट्टीत सुपरिचित आहे. एकेकाळी कट्टर शिवसैनिक अशी प्रतिमा असणार्या डॉ. राजेश पाटील यांना प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये पुढारी म्हणूनही ओळखले जात आहे. शिवसेना संघटनेत नवी मुंबई शहरप्रमुख पदापर्यत त्यांनी मजल मारली होती. दरम्यानच्या काळात स्थानिक पातळीवरील मतभेदामुळे आणि बदलत्या राजकीय प्रवाहामुळे डॉ. राजेश पाटील शिवसेनेच्या प्रवाहापासून लांब होत गेले. डॉ. राजेश पाटील आज शिवसेनेपासून काही अंतरावर गेले असले तरी शिवसैनिकांमध्ये आजही डॉ. राजेश पाटील यांची प्रतिमा चांगली आहे. डॉ. राजेश पाटील यांची लढवय्या नेता ही प्रतिमा नवी मुंबईत निर्माण झालेली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर डॉ. राजेश पाटील यांनी दरम्यानच्या काळात सातत्याने जनआंदोलने उभारली आहेत. डॉ. राजेश पाटील हे मधल्या काळात मनसेमध्ये जाणार असल्याच्या आणि मनसे त्यांना उमेदवारी देणार असल्याच्या वावड्या मधल्या काळात उठल्या होत्या. पण त्या तथ्यहीन चर्चा केवळ अफवाच असल्याचे अल्पावधीत स्पष्ट झाले. डॉ. राजेश पाटील हे बेलापुरमधून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्रकल्पग्रस्त संघटनेच्या व्यासपिठावरून ते निवडणूक रिंगणात नशिब आजमावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. राजेश पाटील निवडणूक रिंगणात सहभागी झाल्यास प्रस्थापितांसह इच्छूकांचीही राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. डॉ. राजेश पाटील यांच्यामध्ये अपक्ष म्हणून निवडून येण्याची क्षमता नसली तरी कोणाला तरी पाडण्याची क्षमता मात्र निश्चितच आहे. डॉ. राजेश पाटील यांची निवडणूक रिंगणात सहभाग झाल्यास तो सहभाग कोणाला तारणार आणि कोणाला मारणार याची आतापासूनच उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ना. गणेश नाईक आणि भाजपाकडून सौ. मंदाताई म्हात्रे हे दिग्गज निवडणूक रिंगणात असतानाही सध्या नामदेव भगत आणि डॉ. राजेश पाटील यांच्याकडेच सध्या चर्चेचा प्रकाशझोत वळल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळत आहे.